चमकोगिरीने उमेदवारी मिळत नसते, त्यासाठी कर्तृत्व लागते!
माढा (बंडखोर वृत्तसेवा): आपल्या बाजूच्या लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल करुन व माढा लोकसभा मतदारसंघातील काही नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन लोकसभेची उमेदवारी मिळत नसते. तर त्यासाठी पक्षश्रेष्ठींची विश्वासार्हता व कर्तृत्व लागते, चमकोगिरी नव्हे अशा प्रतिक्रिया जनमाणसांतून उमटत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यामध्ये विकासकामांच्या श्रेयवादावरून नेहमीच जुंपलेली असते. परंतु मागणी कुणाचीही असली तरी सत्तेत राहून ज्यांनी प्रश्न सोडविलेले असतात त्यांना आपसुकच श्रेय जाते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जर आपल्या मतदारसंघातील विकासकामे केलीच नसती, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते टॉप टेन मधील खासदार आहेत असे म्हटलेच नसते. विकासाच्या बाबतीत माढा लोकसभा मतदारसंघ देशात आठव्या क्रमांकावर आलाच नसता. माढा लोकसभा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत देशात आठव्या क्रमांकावर आल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर किंवा त्यांचे समर्थक यांनी दिली नाही, तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे हे टीकाकारांनी लक्षात ठेवावे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामावर खूप समाधानी आहेत. त्यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना ना. देवेंद्र फडणवीस त्यांना कुठल्या कारणामुळे डावलायचे? असे म्हणतात. राष्ट्रीय अध्यक्षापासून माढा लोकसभा मतदारसंघ पक्ष निरीक्षक प्रशांत परिचारक यांच्यापर्यंत सर्वजण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे भरभरून कौतुक करतात. मग हे सगळेच वेडे आहेत काय? खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षश्रेष्ठींनीच माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा तयारी करायला सांगितल्यानेच ते पक्षाचा आदेश मानून प्रामाणिकपणे काम करीत आहेत. ज्यांच्यामुळे खासदार झाले त्या सर्व नेतेमंडळींच्या संपर्कात राहून त्यांची कामे करीत आहेत. मग आपल्याला न विसरणाऱ्या खासदारांना माढा लोकसभा मतदारसंघातील नेते विसरतील का? प्रशांत परिचारक यांनीही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीचे समर्थन केल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांतून त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. पण चांगल्याला चांगलेच म्हटले पाहिजे ना! मोहिते पाटलांच्या दृष्टीने ते व्हिलन असले तरी माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक बड्या नेत्यांच्या नजरेत हिरोच आहेत. कारण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदारकीचा पूरेपूर फायदा या नेत्यांना झाला आहे. वास्तविक पाहता मोहिते पाटील सत्तेत असताना सोलापूर जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांना कटू अनुभव आलेत. मोहिते पाटील आपल्या सत्तेचा वापर या नेत्यांसाठी नव्हे तर त्यांच्या परिवारासाठीच केला असे अनेक मोहिते पाटील यांच्या विरोधात गेलेले नेते बोलत आहेत. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी आपली सत्ता पणाला लावली असा सूर बहुतांशी कार्यकर्त्यांतून निघत आहे. त्यामुळेच सर्वजण मिळून मोहिते पाटील यांना विरोध करीत आहेत. पण काही वर्षांपासून सत्तेच्या विजनवासात गेलेल्या मोहिते पाटलांना पुन्हा सत्ता मिळावी यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून कॅम्पेन सुरू केल्याचे दिसत आहे. परंतु सोशल मीडियावर आपल्या समर्थनार्थ प्रतिक्रिया घेऊन, माढा लोकसभा मतदारसंघात दौरे करून व बॅनरबाजीच्या माध्यमातून चमकोगिरी करीत पक्षश्रेष्ठींवर दबाव निर्माण करुन धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल असे वाटत असले तरी यामुळे उमेदवारी नव्हे, मात्र ते नाराजी ओढवून घेतील अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.