प्रशासकीय कार्यक्रमात भाजपा पदाधिकाऱ्यांना डावलल्याने कार्यकर्त्यांतून तीव्र निषेध!
आम्ही फक्त पार्टीसाठीच काम करायचे, व्यासपीठावर यायचेच नाही का?- बाळासाहेब सरगर
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन व कळंबोली-नातेपुते-शिंगणापूर या रस्त्याचा लोकार्पण सोहळा लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी संयुक्तरित्या पार पाडून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. प्रशासनाने इतका मोठा कार्यक्रम घेतलेला असताना व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण तालुक्यात येत असतानाही त्याची कुठे बातमी दिली नाही. बातमी दिली नसली तरी पदाधिकाऱ्यांना निरोप देणे हे त्यांचे काम होते. मात्र प्रशासनाने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलल्याने भिंतीवर कमळ काढून घर चलो अभियान राबवून कार्यकर्त्यांनी फक्त पार्टीसाठीच काम करायचे का? व्यासपीठावर यायचेच नाही का? असा प्रश्न उपस्थित करून भाजपा किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला.
यावेळी पुढे बोलताना बाळासाहेब सरगर म्हणाले की, प्रोटोकॉलप्रमाणे पत्रिका काढली, पण प्रशासनाने कुणालाही निमंत्रित केले नाही. भारतीय जनता पार्टीचे तिन्ही जिल्हाध्यक्ष माळशिरस तालुक्यात प्रामाणिकपणे काम करतात. एवढे काम करत असतानाही प्रशासकीय कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना का डावललं जातंय हा खरा सवाल आहे. माळशिरस तालुक्याचे दोन आमदार व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांना सुध्दा कार्यकर्त्यांची कदर असायला पाहिजे होती. पण त्यांनी का कदर केली नाही याची आमच्या मनात शंका निर्माण होतेय. सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण माळशिरस तालुक्यामध्ये येत असताना त्यांच्या समोरील खुर्च्या रिकाम्या राहिल्याने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे अपयश नेत्यांच्या समोर दिसलं हे केवळ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाले याचा आम्ही निषेध करतो.
सोलापूर जिल्हा सहप्रभारी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य के. के. पाटील बोलताना म्हणाले की, दोन्ही कार्यक्रमांच्या ठिकाणी प्रोटोकॉल म्हणून दोन्ही आमदार व खासदारांचे नाव होते. परंतु या कार्यक्रमाला सामान्य जनता उपस्थित नव्हती. याचे कारण लोकांना हा कार्यक्रम आहे याची माहितीच नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासकीय कार्यक्रम होता. परंतु दोन्ही आमदार आणि खासदार उपस्थित असताना पक्षाचे पदाधिकारी मात्र गैरहजर होते. सरकारने जी कामे केली आहेत ती जनतेपर्यंत पोहोचविणे हा कार्यक्रमाचा खरा हेतू आहे. परंतु या कार्यक्रमाचा हेतूच असफल झाला. कारण प्रशासनाने कुणालाही माहिती दिली नाही. म्हणून त्यांना पंचायत समिती आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी आणून बसवावे लागले. नातेपुतेच्या कार्यक्रमात तर सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या. म्हणजे प्रशासनाने जाणीवपूर्वक सरकारने केलेले चांगले काम असफल कसे होईल असेच नियोजन केले का? असा प्रश्न विचारून के. के. पाटील यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला. याप्रसंगी सोलापूर जिल्हा सहप्रभारी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य के. के. पाटील व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्यासह अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुक्तार कोरबू, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा युवराज वाघमोडे, मिनीनाथ मगर आदी मान्यवर उपस्थित होते.