राहुल ढेरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळशिरस तालुका कार्याध्यक्षपदी, तर राजीव गायकवाड यांची अकलूज शहराध्यक्षपदी नियुक्ती
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुती आहे. मात्र या सत्तेच्या सारीपाटात स्वाभिमानी कार्यकर्त्यांची होत असलेली कुचंबणा लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बळ देण्याच्या हेतूने पदे देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाअंतर्गत कुरघोड्यांना वैतागून डॉ. अक्षय वाईकर या उमद्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यास सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पदाबरोबरच पंढरपूर तालुका प्रभारी निरीक्षक हे पद दिले. त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमकपणे उभे राहून त्यांना आव्हान देणाऱ्या राहुल ढेरे यांची माळशिरस तालुका कार्याध्यक्षपदी, तर राजीव गायकवाड यांची अकलूज शहराध्यक्षपदी निवड करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक वाढवली आहे.
राहुल ढेरे यांनी मोहिते पाटील विरोधक उत्तमराव जानकर यांच्याबरोबर निःस्वार्थीपणे काम करून कधीही कुठल्या पदाची अपेक्षा ठेवली नव्हती. स्वतःच्या व्यवसायाच्या जोरावर प्रामाणिकपणे राजकारणात झोकून देत त्यांनी स्वाभिमानी राजकारण केले. त्यामुळे त्याचा धाडसी व आक्रमक स्वभाव हेरून अजित पवार यांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळशिरस तालुका कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. तर अकलूज शहराध्यक्ष राजीव गायकवाड यांची निवड केली आहे. गेल्या आठवड्यात मिलींद पवार याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अकलूज शहराध्यक्षपदी निवड केली होती. अशा पध्दतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळशिरस तालुक्यात सत्ताधाऱ्यांना आव्हान देणाऱ्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केल्याने माळशिरस तालुक्यात आता घड्याळाची टिकटिक वाढेल असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांबरोबरच त्यांच्या समर्थकांतून बोलले जात आहे. राहुल ढेरे, राजीव गायकवाड, डॉ. अक्षय वाईकर, मिलींद पवार यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.