डॉ. अक्षय वाईकर यांची सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीसपदी निवड
राष्ट्रवादीची टिकटिक वाढविण्यासाठी डॉ. अक्षय वाईकर झपाटल्यासारखे काम करणार!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): भाजपाअंतर्गत गटबाजी व कुरघोड्यांना वैतागून हातात घड्याळ बांधलेल्या अकलूज येथील डॉ. अक्षय वाईकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीसपदी निवड केल्याने त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता काही महिन्यांपासून शांत असलेले डॉ. अक्षय वाईकर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची टिकटिक वाढविण्यासाठी झपाटल्यासारखे काम करणार असा सूर जनतेतून निघत आहे.जोशी समाज समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते डॉ. अक्षय वाईकर यांनी आपली राजकीय कारकीर्द भाजपमधून सुरू केली. आमदार रामभाऊ सातपुते यांच्या सहकार्याने गेली दहा वर्षे त्यांनी भाजपाचे काम जोमाने केले. मात्र पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे त्यांना पद मिळाले नाही. डॉक्टर संघटनेचे मिळालेले पदही त्यांच्याकडून लगेच काढून घेतले होते. त्यामुळे ते कमालीचे दुखावले होते. त्याचाच परिपाक म्हणून भाजपमध्ये होत असलेल्या घुसमटीला कोंडी फुटली आणि अखेर नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अक्षय वाईकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन माळशिरस तालुक्यात अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना डॉ. अक्षय वाईकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेशदादा पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील,राष्ट्रवादी माळशिरस तालुक्याचे नेते, जनतेचे आमदार व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश आबा पालवे, माझे सहकारी मित्र व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटन सरचिटणीसपदी निवड केल्याबद्दल सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांचे आभार मानतो. तसेच पक्षाने माझ्यावर विश्वासाने मोठी जबाबदारी दिल्याने ती मी नक्कीच यशस्वीरित्या पार पाडेन व या पदाला योग्य तो न्याय देईन, आणि संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करेन. दरम्यान डॉ. अक्षय वाईकर यांच्याकडे कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे. त्यांना राज्य लेव्हलच्या कामांचा दांडगा अनुभव आहे. सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? व त्या कशा सोडवायच्या? याचा त्यांना गत दहा-बारा वर्षांपासून चांगला अनुभव आहे. त्यामुळे डॉ. अक्षय वाईकर लवकरच पक्षवाढीसाठी सर्वसामान्यांना सोबत घेऊन झपाटल्यासारखे काम करतील असा विश्वास माळशिरस तालुक्यातील जनतेतून व्यक्त केला जात आहे.