डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेले खंड व संविधानाच्या प्रती कमी पडल्यास बार्टीच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार- वैभव गीते
पुणे (बंडखोर वृत्तसेवा): डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्यामार्फत भारतीय संविधानाच्या प्रती नाममात्र दरात उपलब्ध केल्या जातात. महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे 6 डिसेंबर रोजी व 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे बार्टीच्या शासकीय स्टॉलवरून विक्री केली जाते. या दोन्ही ठिकाणी लाखो अनुयायी येतात. परंतु संविधानाच्या प्रती या थोड्या प्रमाणात छापल्याने दोन तासात संविधानाच्या प्रती संपून जातात आणि बार्टीचे अधिकारी व विभागप्रमुख, कर्मचारी संविधानप्रती संपल्या आहेत अशी उत्तरे देतात हे प्रत्येक वर्षीचे रडगाणे आहे. त्यामुळे यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेले खंड व संविधानाच्या प्रती कमी पडल्यास बार्टीच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा एनडीएमजेचे राष्ट्रीय सचिव वैभव गीते यांनी दिला आहे.
यावेळी पुढे बोलताना वैभव गीते म्हणाले की, जाणूनबुजून बार्टीचे महासंचालक व विभाग प्रमुख हे भारतीय संविधानाच्या प्रती कमी छापतात. फोटोझिंको प्रिंटिंग प्रेसमधून कमी प्रती छापून घेतात. त्यामुळे कमी प्रती तात्काळ संपतात आणि भारतभरातून आलेली आंबेडकरी जनता, आंबेडकरी अनुयायी संविधानाच्या प्रति संपल्याने प्रती विकत घेऊ शकत नाहीत. त्यांच्या पदरी निराशा येते. या सर्व बाबींची माहिती महासंचालक व विभागप्रमुख यांना माहिती असतानाही प्रत्येक वर्षी जाणूनबुजून कमी प्रती छापून घेऊन आंबेडकरी आणुयायांना संविधानांच्या प्रतींपासून वंचित ठेवतात ही बाब गंभीर आहे. त्यामुळे बार्टीचे महासंचालक व विभागप्रमुख यांनी चैत्यभूमी 6 डिसेंबर रोजी शिवाजी पार्कवरील स्टॉलवर,1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील स्टॉलवर भारतीय संविधानाच्या व बाबासाहेबांचे खंड प्रत्येकी एक लाख (1,00000) प्रती छापाव्यात. संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले मराठी भाषा अनुवादित केलेले सर्व खंड
छापून घ्यावेत व नाममात्र शासकीय किंमतीत विक्रीसाठी ठेवावेत. तसेच संविधानमध्ये आजपर्यंत झालेले सर्व बदल, संशोधन नवीन आवृत्तीसह छापून घ्याव्यात. तसेच यापुढे संविधान प्रती व बाबासाहेबांचे खंड संपलेले आहेत असे उत्तर विभाग प्रमुख व संबंधित कर्मचारी यांच्याकडून दिल्यास, कसूर झाल्यास बार्टीच्या पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर असणाऱ्या विभाग प्रमुख व इतर कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असे वैभव गीते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.