रिव्हॉल्व्हरच्या माध्यमातून गावठी धुरंधरचे कारनामे!
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हाताने गोळी झाडल्याची ॲक्शन केल्याचे फोटो व्हायरल करुन त्यांना मोहिते पाटील समर्थकांकडून खलनायक ठरवले जात आहे. पण खरे खलनायक तर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हेच आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांचेवर ३१ गुन्हे दाखल असून त्यामध्ये आर्म ॲक्टच्याही गुन्ह्याचा समावेश आहे. या खासदारांनी आपल्या पतसंस्थेतून कर्ज घेतलेल्या सोमनाथ हुलगे या कर्जदाराच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावल्याने त्यांच्यावर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल झाला आहे. तर एकदा शिवरत्न नॉलेज सिटीवर कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या डोक्यावर दारुच्या बाटल्या ठेवून त्या रिव्हॉल्व्हरच्या गोळीने फोडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्यावर दहशत निर्माण केल्याचीही चर्चा आहे. अशा प्रकारचे या गावठी धुरंधरचे अनेक कारनामे गुलदस्त्यात आहेत.
वास्तविक पाहता अकलूज शहरावर मोहिते पाटलांची प्रचंड दहशत होती. ती दहशत पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माजी आमदार रामभाऊ सातपुते या त्रिमूर्तींनी मोडीत काढली आहे. म्हणूनच मोहिते पाटलांना त्यांची ॲलर्जी आहे. मोहिते पाटलांच्या दहशतीचे किस्से अगणित आहेत. एखादा स्वाभिमानी अकलूजकर विरोधात गेला की त्याला खोट्या गुन्ह्यात तर अडकवायचे किंवा पाळलेल्या गुंडांमार्फत त्याचा खून तरी घडवून आणायचा. कारण तेव्हा सर्व शासन, प्रशासन व्यवस्था त्यांच्या ताब्यात होती. पण आता नियतीने त्यांच्या या कुकर्माकडे पाठ फिरवलीय. आता कुठले अधिकारी त्यांचे ऐकेनात. एमएसईबीतील एका अधिकाऱ्याला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी फोन केला असता तो ‘मी मिटींगमध्ये आहे, थोड्या वेळाने फोन करतो’ असा बोलल्याने या गुंड प्रवृत्तीच्या खासदारांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन पहिल्यांदा सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले व त्यानंतर त्यांना मारहाण केल्याची विश्वसनीय सूत्रांकडून बातमी समजली. ही कसली गुंडगिरी? खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूजला बिहार केलंय काय? तरीही त्यांचे समर्थक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ते गुन्हेगारीचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप करतायत. अरे बाबांनो, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर थेट अटॅकच केलाय, त्यांची प्रवृत्ती जरा बघा! मोहिते पाटलांची दहशत मोडीत काढणाऱ्या जयकुमार गोरे यांनाच टार्गेट केले जात असल्याचे पाहून नवल वाटतंय. पण जनता सूज्ञ झालीय. त्यांना कोण कसं आहे हे समजतेय. म्हणून तर या त्रिमूर्तींच्या मागे अकलूजच्या जनतेसह माळशिरस तालुक्यातील बहुतांश कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत. जे परिवर्तनशील असतात त्यांनाच बदनाम केले जाते. त्याच धर्तीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना बदनाम केले जात असले तरी ईराला पीर मिळालाय अशी अकलूजकरांतून चर्चा होताना दिसत आहे.