रामभाऊ सातपुते यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): ऊसतोड मजुराच्या पोटी जन्म घेतल्याने आमदार रामभाऊ सातपुते यांना सर्वसामान्यांच्या व्यथा काय असतात हे चांगलेच ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी १० ते १२ तास जनता दरबार भरवून माळशिरस तालुक्याचा कधी नव्हे तो न भूतो न भविष्यति असा विकास केला आहे. त्यामुळेच मोहिते पाटील व उत्तम जानकर या दोन्ही प्रस्थापित शक्ती एकत्र येऊनही रामभाऊ सातपुते यांनी १ लाख ८ हजार ५५० मतं घेऊन कडवी झुंज दिली आहे. ही बाब लक्षात घेऊन माळशिरस तालुक्यातील जनतेचे खऱ्या अर्थाने पालकत्व करण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठींनी रामभाऊ सातपुते यांचे पुनर्वसन केलेच पाहिजे अशा प्रतिक्रिया माळशिरस तालुक्यातील जनतेतून उमटत आहेत.
मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातील विकासाबाबत २०१९ पर्यंत गटबाजीचेच राजकारण केले. आपल्या विरोधकांच्या पश्चिम भागातील गावांना विकासापासून वंचित ठेवून भकास केले होते. सत्तेचा वापर सूडबुद्धीने करुन मोहिते पाटलांनी आपल्या विरोधात काम करणाऱ्या गावांवर खूप मोठा अन्याय केला होता. ना कधी जनता दरबार भरवले, ना लोकांचे प्रश्न सोडवले. उलट जे आपल्या विरोधात काम करतात त्या रंजनभाऊ गिरमे यांच्या डिस्टलरीचा प्रश्न स्व. आमदार हनुमंतराव डोळस यांच्यामार्फत विधानसभेत उपस्थित करुन त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर इतर लढाऊ कार्यकर्त्यांनाही अडचणीत आणण्यासाठी मोहिते पाटलांनी सत्तेचा गैरवापर केला होता. २००९ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ एससीसाठी राखीव झाल्यानंतरही सलग दोन टर्म आमदारकी उपभोगलेल्या स्व. हनुमंतराव डोळस यांनी स्वतंत्रपणे काम न करता मोहिते पाटलांसाठी कटपुतलीप्रमाणे काम केले. कुणाला शिफारस देण्याचाही त्यांना अधिकार नव्हता. मात्र २०१९ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघातून रामभाऊ सातपुते आमदार झाल्यानंतर त्यांनी मोहिते पाटलांची कटपुतली न बनता स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली. गेल्या सत्तर वर्षांपासून जी गावं विकासापासून वंचित होती त्या गावांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करुन त्याचे नंदनवन केले. आपल्या कारकिर्दीत मोहिते पाटलांकडे कोरी लेटरपॅड देऊन त्यांचे दास न बनता जनतेचे दास म्हणूनच रामभाऊ सातपुते यांनी काम केले. त्यांच्या चेहऱ्यावर कधी आमदारकीची घमेंड नव्हती. आपल्या आमदारकीचा उपयोग जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तर केलाच, पण पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार करून अनेकांचे जीव वाचवत आरोग्यदूत म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. मग रामभाऊ सातपुते यांच्या विरोधात कितीही बलाढ्य उमेदवार असला तर जनता त्यांच्याच पाठीशी उभी राहणार! रामभाऊ सातपुते पुन्हा आमदार व्हावेत यासाठी कसल्याही दबावाला, दहशतीला बळी न पडता माळशिरस तालुक्यातील जनतेने त्यांना भरभरून मतदान केले. जनतेचे आपल्यावरील प्रेम पाहून रामभाऊ सातपुतेही एकाकी अत्यंत हिंमतीने लढले. परंतु मोहिते पाटील व उत्तम जानकर या दोन्ही प्रस्थापित शक्ती एकत्र असतानाही रामभाऊ सातपुते यांनी १ लाख ८ हजार ५५० मतं घेऊन कडवी झुंज दिली. माळशिरस तालुक्यातील प्रस्थापितांच्या दहशतीला व दबावतंत्राला न जुमानता जनतेने रामभाऊ सातपुते यांना भरभरून मतदान दिल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांना वाऱ्यावर सोडू नये. आमदार रामभाऊ सातपुते यांच्यासारख्या निर्भीड, धाडसी, लढवय्या नेतृत्वाचे भाजपा पक्षश्रेष्ठींनी विधानपरिषदेवर घेऊन पुनर्वसन करावे आणि माळशिरस तालुक्यातील सरंजामी नेतृत्वाचा नायनाट करण्यासाठी रामभाऊ सातपुते यांच्याकडे माळशिरस तालुक्यातील जनतेचे पालकत्व द्यावे अशी चर्चा माळशिरस तालुक्यातील जनतेत होताना दिसत आहे.