जातचोर थापाड्या!
नुकताच माळीनगर याठिकाणी अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे आमदार उत्तम जानकर यांनी एससी समाजाच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांच्यावर एससी समाज नाराज असताना सुध्दा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. या गर्दीचा गैरफायदा घेऊन व सुजात आंबेडकर यांचे फॉरेनमध्ये इलेक्शन कॅम्पेनचे शिक्षण झालेले असताना त्यांच्यासमोर उत्तम जानकर यांनी बऱ्याच कपोलकल्पित थापा मारून आपण श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांच्या किती जवळचे होतो हा लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु २०१४ साली राजगृहावर भेटायला गेल्यानंतर श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना हाकलून लावले होते हा खरा इतिहास आहे.
एससी समाजाच्या बोकांडी बसलेल्या उत्तम जानकरांनी आजपर्यंत थापा मारूनच राजकारण केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी पूर्वीपासूनच भाजपाचा कट्टर कार्यकर्ता आहे आहे, त्यामुळे माझ्या निष्ठेचा प्रश्नच नाही अशी थाप मारून ते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत स्पेशल विमानाने देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायला नागपूरला गेले होते. त्यावेळी त्यांची डिमांड पाहून त्यांच्यासोबत असणाऱ्यांचे डोळेच फिरू लागले. त्यांची मागणी मान्य न होताच जातचोर उत्तम जानकरांनी थेट पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. यावेळी आपला मोहिते पाटलांच्या विरोधातील अनेक वर्षांचा संघर्ष विसरून मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसत आमदारकीच्या शब्दावर धैर्यशील मोहिते पाटलांना खासदार करण्यासाठी माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांशी जुळवून घेतले. पण जनता त्यांच्यासोबत नव्हती हे मतदानानंतर दिसून आले. तर ज्या लोकांनी शेतकरी कारखाना उभा करण्यासाठी मदत केली, आपल्या जमिनी, पैसा दिला अशांनाही दगा दिल्याने अशा या विश्वासघातकी उत्तम जानकरांचा आंबेडकरी घराण्याशी काय संबंध? आणि म्हणे मी पूर्वी भारिपचा माळशिरस तालुकाध्यक्ष होतो, वेळापूरमध्ये मी पहिल्यांदा प्रकाश आंबेडकरांचा कार्यक्रम घेतला होता, प्रकाश आंबेडकरांचे लग्न जमवायला मी होतो, त्यांच्या लग्नालाही होतो, नांदेडमध्ये १९९३ साली भीमराव केराम यांना उभे केल्यानंतर एक महिना त्याठिकाणी प्रचाराला होतो. अशा किती थापा मारणार जातचोरा… आंबेडकरी जनता इतकी मूर्ख वाटतेय का? तुम्ही काहीही बरळायचे आणि आम्ही ते निमूटपणे ऐकायचे असे कसे होईल? जातचोर उत्तम जानकरांच्या थापा ऐकून त्याठिकाणी उपस्थित असलेले एक मान्यवर इतक्याही अति थापा मारायच्या नसतात असे जानकरांना म्हणाल्याचे समजते. जातचोर उत्तम जानकरांच्या थापा ऐकून त्यांचे सातवीपासून मित्र असलेल्या गणेश चव्हाण यांना आम्ही फोन करून याबाबत विचारले, तेव्हा ते खळखळून हसले. हे साफ खोटे आहे असे म्हणून त्यांनी जानकरसोबत फिरत असताना आलेले अनुभव सांगितले. एड. सुभाष (आण्णा) पाटील यांनी जेव्हा उमेदवारी मागितली तेव्हा उत्तम जानकर श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांना सोलापूरला भेटायला गेले असता त्यांनी भेट सुध्दा दिली नाही. मी जोपर्यंत सोबत होतो तोपर्यंत तरी त्यांच्याकडून श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांचा फक्त विषयच ऐकतोय. पण ते एकदाही त्यांच्यासमोर गेले नाहीत. २०१४ साली जेव्हा आम्ही उत्तम जानकर यांच्यासोबत मुंबईला राजगृहावर भेटायला गेलो होतो तेव्हा तर उत्तम जानकरांना त्यांनी हाकलले होते याचा मी साक्षीदार आहे असे यावेळी बोलताना गणेश चव्हाण म्हणाले. वास्तविक पाहता मी २०१० साली भारिप बहुजन महासंघाचा अकलूज शहर सरचिटणीस असताना पूर्वी मुरलीधर चंदनशिवे हे माळशिरस तालुकाध्यक्ष होते असे ऐकले होते. त्यानंतर पॅंथर विजय जाधव यांनी काही काळ तालुकाध्यक्ष म्हणून काम केले. मी विचारवंत प्रकाश काले यांच्यासोबत फिरत असल्याने त्यांच्यामुळे काही महिनेच भारिपमध्ये होतो. परंतु पत्रकारितेला सुरूवात केल्यावर फक्त बंडखोर या वृत्तपत्रावर फोकस केला. आमची जडणघडणच आंबेडकरी चळवळीत झाल्यामुळे चळवळीत कोण कोण होते हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. तर जेव्हा उत्तम जानकर यांच्यासोबत आक्रमकपणे लिहिणारा कुठला पत्रकार नव्हतो तेव्हा फक्त बंडखोर त्यांच्याजवळ होता. त्यामुळे त्यांचे बरेच उपद्व्यापही आम्हाला माहिती आहेत. असे दलबदलू, विश्वासघातकी, मेलेल्या मढ्यावरच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या उत्तम जानकर यांच्यासारख्या धोकेबाजने आंबेडकर घराण्याशी आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न केल्यावर आम्ही स्वस्थ कसे बसू? आम्ही अशा थापाड्या जातचोराचा बुरखा फाडणारच!