सत्तेच्या तुकड्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील आणखी किती लाचार होणार?
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): मनपा निवडणुकीतील भाजपाच्या घवघवीत यशानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना व्हील चेअरवर मुंबईला नेऊन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट इथेनॉलच्या मुद्द्यावरुन घेतली असल्याचे बोलले जात असले तरी आपल्या समोरील अडचणी दूर करुन राजकीय बस्तान बसविण्यासाठी सदरची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त समजते. दरम्यान निवडणुकीत भाजपाच्या विरोधात काम करायचे, आणि निवडणूक संपली की सत्तेच्या तुकड्यासाठी काही ना काही कारणाने पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या राजकीय अस्तित्वासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्यासमोर गयावया करायचे ही बाब शिवरत्नसाठी खूपच लाजिरवाणी आहे. एकटे रणजितसिंह मोहिते पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटावयास गेल्यास ते त्यांना भेटत नसल्यामुळे त्यांना विजयदादांना मुंबईला न्यावे लागते. काय ही केविलवाणी परिस्थिती? कुठे गेला यांचा स्वाभिमान? सातत्याने अहंकारात वावरणारे रणजितसिंह मोहिते पाटील सत्तेच्या तुकड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आणखी किती लाचार होणार? असा सूर अकलूजकरांतून निघत आहे.
गर्वाचे घर नेहमी खाली असते अशी एक म्हण आहे. त्याच म्हणीचा प्रत्यय शिवरत्नवरील मोहिते पाटलांची दारूण अवस्था पाहून येतोय. दैव देते, पण कर्म नेते. त्याप्रमाणे शिवरत्नवरील मोहिते पाटलांना त्यांच्या कर्माने, अहंकाराने जमिनीवर आणले. जेव्हा सत्तेचा रूबाब होता तेव्हा मग्रूर, अहंकारी रणजितसिंहांचे विमान जमिनीवर कधी उतरतच नव्हते. कुणी नमस्कार केला तरी ते त्याच्याकडे बघत नसायचे. अशा या घमेंडी, अहंकारी प्रवृत्तीच्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सारखे नाक घासावे लागतेय. मात्र भाजपाशी गद्दारी करणाऱ्या रणजितसिंहांच्या चुकीला ते माफी देत नाहीत. रणजितसिंह जेव्हा भेटण्याचा प्रयत्न करतात तेव्हा वेळ निघून गेलीय एवढं एकच वाक्य फडणवीस यांचं ठरलेलं असतं. त्यामुळे विजयदादांच्या मध्यस्थीने तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ जाऊन त्यांची नाराजी दूर करता येईल अशी रणजितसिंहांना आशा वाटली. परंतु मोठमोठ्या सरंजामी नेतृत्वाला जमिनीवर आणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षाशी मोहिते पाटलांनी केलेली गद्दारी कसे विसरतील? आणि मोहिते पाटलांनी तरी विरोधात काम करून त्यांच्याकडून अपेक्षा का ठेवावी? मोहिते पाटील इतके गलितगात्र झालेत का? राजकारणात आपल्याला काही नाही मिळाले तरी चालेल, पण आपला स्वाभिमान कुणापुढे गहाण ठेवणार नाही ही स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे सूपुत्र डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची वृत्ती आहे. गेल्या १४ वर्षांच्या राजकारणात त्यांनी कधीही आपल्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. पण शिवरत्नचे मग्रुर राजपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सत्तेसाठी गुडघे टेकत आहेत. जेव्हा भाजपाला मोहिते पाटलांची गरज होती तेव्हा त्यांनी साथ सोडली, मग आता ना. फडणवीस त्यांना कशी मदत करणार? रणजितसिंह मोहिते पाटलांच्या विधानपरिषदेची आमदारकी मे २०२६ मध्ये संपतेय. त्यानंतर आपले काय? या एकाच विचाराने रणजितसिंहांची झोप उडालीय. पालकमंत्री जयकुमार गोरे व राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना जेरीस आणलंय. राम सातपुते यांनी मोहिते पाटलांच्या अकलूजमध्ये सुध्दा कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केलंय. नुकत्याच पार पडलेल्या अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीत राम सातपुते यांनी भाजपाचे चार नगरसेवक निवडून आणलेत. तर आणखी चार-पाच नगरसेवक अल्पशा मतांनी पराभूत झालेत. त्यामुळे मे २०२६ नंतर विधानपरिषदेवर राम सातपुते यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. मग रणजितसिंह मोहिते पाटील यांचे काय होणार? शिवरत्नवरील सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काम करीत असून धैर्यशील मोहिते पाटील हे त्या पक्षाचे खासदार आहेत. आणि रणजितसिंहांनी सुध्दा लोकसभा निवडणुकीपासून नेहमी भाजपाच्याच विरोधात काम केले आहे. मग ना. फडणवीस भेटायचे सोडाच, यांना तरी त्यांना भेटायला जाताना काय तरी वाटायला पाहिजे होते. तरीही एकेकाळचे अहंकारी राजपुत्र सत्तेच्या तुकड्यासाठी ना. फडणवीस यांचेसमोर लीन होताना दिसत आहेत. वास्तविक पाहता सत्तेशिवाय मोहिते पाटलांची अवस्था पाण्यातून काढलेल्या माशाप्रमाणे होते. पण आता त्यांचा सत्ताकाळ संपलेला आहे. राम सातपुते यांनी अनेकांना मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करून बोलायला शिकवले आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यासह अकलूजमध्येही परिवर्तन होत असलेले दिसत आहे. एकंदरीत आपणास वरचढ ठरत असलेल्या राम सातपुते यांना रोखण्यासाठी व पुन्हा एकदा जुळवून घेऊन सत्तेत सामील होण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील कितीही हतबल झाले तरी त्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सुरू असलेली लाचारी पाहून एकेकाळचे मग्रुर, अहंकारी राजपुत्र हेच रणजितसिंह मोहिते पाटील आहेत का? अशी चर्चा अकलूजसह परिसरातील लोकांतून होताना दिसत आहे.