आ. उत्तम जानकरांच्या रूपात स्व. हनुमंतराव डोळस आजही जीवंत !
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): २००९ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर मोहिते पाटलांनी मुंबईस्थित असलेल्या स्व. हनुमंतराव डोळस यांना माळशिरस तालुक्यातून आमदार केले होते. तेव्हा आमदार हनुमंतराव डोळस हे नामधारी होते, त्यांचे लेटरहेड हे शिवरत्न बंगल्यावरच असायचे. त्याकाळी त्यांची इच्छा असूनही डोळस लोकांना मदत करू शकत नव्हते. कारण मोहिते पाटलांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण होता. एकप्रकारे आमदार स्व. हनुमंतराव डोळस असले तरी तालुका हे मोहिते पाटीलच चालवत होते असे म्हटले तरी हरकत नाही. तीच अवस्था आता विद्यमान आमदार उत्तम जानकरांची झालेली दिसत असल्यामुळे त्यांच्याकडे पाहून माळशिरस तालुक्यातील जनतेला स्व. हनुमंतराव डोळस हे आजही जानकरांच्या रूपाने जीवंत असल्याचा भास होत आहे.
आमदार उत्तम जानकर हे पूर्वी वाघ होते, पण आता त्यांचे मांजर झालेले दिसत आहे. जानकरांनी मोहिते पाटलांच्या विरोधात ३० वर्षे संघर्ष केला, पण आता ते आमदारकी मिळाल्यामुळे मोहिते पाटलांच्या हातची कठपुतली बाहुली झाले आहेत. हे वाक्य मिर्ची झोंबल्यासारखे त्यांना व त्यांच्या समर्थकांना झोंबत असले तरीही वास्तव आहे. जानकरांनी त्यांचे विरोधक जयसिंह मोहिते पाटील यांचे आमदारकीसाठी बुटासकट पाय धरले होते. तेव्हाच स्वाभिमानी मोहिते पाटील विरोधकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवून माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे नेतृत्व मान्य करून जानकरांची साथ सोडली. एकदा तुम्ही एखाद्याच्या वळचणीला गेलात की, ती व्यक्ती तुमचा कचराच करीत असते. अकलूज नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारातही जयसिंह मोहिते पाटलांनी ‘जानकर शहाणे झाले, शरण आले म्हणून आमदार झाले’ असे वक्तव्य करून त्यांची अब्रू पार विजय चौकातील खुंटीलाच टांगली. उत्तम जानकर आमदार होऊन सव्वा वर्ष झाले. तरीही त्यांनी कुठली विकासकामे केलीत? अकलूज-वेळापूर रस्त्यावर तर मोठमोठे खड्डे आहेतच, पण तालुक्यात त्यांनी काय विकास केलाय? फक्त स्टंटबाजी करून चमकोगिरी करायचेच यांचे धंदे सुरू आहेत. ऊठसूठ पालकमंत्री जयकुमार गोरे व रामभाऊ सातपुते यांच्यावर टीका हाच त्यांचा उद्योग झालाय. मोहिते पाटील कसे खूश राहतील याचसाठी विरोधकांना टार्गेट करण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. उत्तम जानकरांचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली. अक्षरशः ते उध्वस्त झाले. साजिदभाई सय्यद यांनाही अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण जेव्हा त्यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्या स्वप्नांना सुरूंग लावून उत्तम जानकरांनी मोहिते पाटलांच्या इशाऱ्यावर साजिदभाई सय्यद यांना अर्ज माघारी घ्यायला लावला. उत्तम जानकर हे माळशिरस तालुक्याचे आमदार असूनही ते आपल्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याला नगरसेवकही बनू देत नसतील तर मग त्यांचे हात किती बांधले आहेत? आता जानकरांच्या गोटात असलेल्या काही कार्यकर्त्यांनी स्व. हनुमंतराव डोळस यांना जोरदार विरोध केला होता. कारण ते मोहिते पाटलांचे लाचार आमदार आहेत असा घणाघात स्वयंघोषित स्वाभिमानी कार्यकर्ते करीत होते. मग त्यांना आता जानकरांनी शेपूट घातलेले दिसत नाही का? आता त्यांनी आपला स्वाभिमान कुठे गहाण ठेवला? एकेकाळी आम्हीही उत्तम जानकरांचे समर्थक होतो. आमच्यासोबत त्यांचे लहानपणापासूनचे मित्र गणेश चव्हाण हेही जानकरांपासून दूर झाले होते. कारण त्यांच्या डोक्यात एक वेगळीच हवा होती. अत्यंत विश्वासाने आम्ही सुमित्रा पतसंस्थेचा विषय जानकरांच्या हातात दिला होता, पण तो विषय त्यांनी मॅनेज केला. मोहिते पाटलांबरोबर लुटूपुटूची लढाई लढून स्व स्वार्थासाठी उत्तम जानकर आता शिवरत्न बंगल्याच्या वळचणीला आपला लढवय्या बाणा हरवून गेले आहेत. ते आता शिवरत्नवरील मोहिते पाटलांच्या ओंजळीने पाणी पित असल्यामुळे त्यांना कुणाचे काही देणेघेणे नाही. आपण भले आणि आपली आमदारकी भली याच कोषात अडकून उत्तम जानकरांनी स्वतःला मोहिते पाटलांसमोर सरेंडर केल्यामुळे त्यांची अवस्था सर्कशीतल्या वाघासारखी झाली आहे. म्हणूनच अकलूजसह माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी मोहिते पाटील विरोधक जानकरांकडे स्व. हनुमंतराव डोळस यांची सावली म्हणूनच पाहत असल्याचे दिसून येत आहे.