रामभाऊ घातक हैं, इसलिये तुम घायल हो |
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): नगराध्यक्षासह २७ पैकी २३ जागा जिंकून शिवरत्नवरील मोहिते पाटलांनी अकलूज नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी धुरंधर चित्रपटातील ‘घायल हूँ इसलिये घातक हूँ’ हा डायलॉग आपल्या भाषणात मारला. मात्र वास्तव वेगळे आहे. “सामनेवाला रामभाऊ सातपुते घातक हैं इसलिये धैर्यशील मोहिते पाटील घायल हैं” असा सूर अकलूजमधील चौकाचौकातून निघत आहे.
आजपर्यंतच्या माळशिरस तालुक्यातील राजकारणात मोहिते पाटलांना विरोध करणारे विरोधक त्यांना मॅनेज होते. परंतु माजी आमदार रामभाऊ सातपुते हे त्यांच्यासाठी घातक आहेत. कारण विद्यार्थी दशेपासून रामभाऊ सातपुते यांनी आपल्या न्यायहक्कांसाठी आक्रमकपणे रस्त्यावरची लढाई लढली आहे. म्हणूनच त्यांना सर्वसामान्यांची जाण आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी पूर्वी आपल्या सत्तेचा गैरवापर करून विजय शुगर व विजय पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नांना सुरूंग लावून त्यांची फसवणूक करीत त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. त्याचबरोबर सत्तेच्या जोरावर गावगुंडांना पोसून अकलूज व परिसरात दहशत निर्माण करून काहीजणांचे त्यांनी खूनही घडवून आणल्याचे त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. या आरोपांमुळे व संस्थांमधील गैरव्यवहारामुळे धैर्यशील मोहिते पाटील चांगलेच अडचणीत आले आहेत. सत्तेच्या जोरावर लोकांमध्ये दहशत निर्माण करून त्यांना दहशतीत ठेवणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या पाठीमागे तर रामभाऊ सातपुते कर्दनकाळच बनून लागले आहेत. म्हणूनच मोहिते पाटलांना त्यांच्याबद्दल मिरच्या झोंबत आहेत. सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी रस्त्यावर उतरणारे, आक्रमक आणि लढवय्ये रामभाऊ सातपुते यांचे पानिपत करण्यासाठी मोहिते पाटील यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. लोकसभा निवडणुकीत रामभाऊ सातपुते यांचा सोलापूरातून पराभव करण्यासाठी मोहिते पाटलांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याशी जुळवून घेत अनेकांच्या गाठीभेटी घेऊन राजकीय समीकरणे जुळवली. तर माळशिरस विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी ३० वर्षांपासून आपले विरोधक असलेल्या व हिंदू खाटिक हा एससीचा बोगस जातीचा दाखला असतानाही उत्तमराव जानकरांशी मोहिते पाटलांनी जुळवून घेतले. इतकेच नव्हे तर त्यांना ‘उत्तम’ डोळस केले. कारण त्यांना माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी बाण्याने लढणारे नेतृत्व वाढू द्यायचे नव्हते. परंतु कितीही पराभव झाले तरी लढाई अर्ध्यावर न सोडता रामभाऊ सातपुते यांनी अकलूजमध्ये मोहिते पाटलांचा चांगलाच घाम काढला. जिथे बोलायला संधी मिळेल तिथे प्रत्येक सभेत रामभाऊ सातपुते धैर्यशील मोहिते पाटलांवर कठोर प्रहार करीत होते. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना जेलमध्ये पाठविण्याची भाषा करीत होते. त्यामुळे मोहिते पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसले. मात्र ना. फडणवीस त्यांची भेट टाळून मोहिते पाटील विरोधकांना भेटून बळ देत होते. कारण चुकीला माफी नाही असा ठाम निर्धार देवाभाऊंनी घेतला होता. धैर्यशील मोहिते पाटील खासदार होऊनही त्यांचा पक्ष सत्तेत नसल्याने त्यांची होत असलेली घुसमट व रामभाऊ सातपुते यांच्या नेहमीच्या धमक्यांना वैतागून त्यांनी विजय चौकातील सभेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून आपली छाती बडवून घेतली होती. त्यानंतर त्यांना रडूही आवरले नव्हते. मात्र या सभेच्या दुसऱ्या दिवशी रामभाऊ सातपुते यांनी त्याच विजय चौकात सभा घेऊन धैर्यशील मोहिते पाटील आपणांस कसे धमकावत आहेत ते स्क्रीनवर दाखवले. त्याचबरोबर पेनड्राईव्हमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अनेक भानगडी आहेत असे म्हणून रामभाऊ सातपुते यांनी त्यांना अक्षरशः गॅसवरच ठेवले होते. दरम्यान अकलूज नगरपरिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष होऊन दहापेक्षा जास्त जागा निवडून येतील असा भाजपाचा अंदाज होता. तर मोहिते पाटील २७-० ने आम्ही जिंकू असे म्हणत होते. परंतु भाजपाने चार जागा जिंकून अकलूज नगरपरिषदेत जोरदार मुसंडी मारली. आजपर्यंत विरोधकांच्या इतक्या जागा कधीच आल्या नव्हत्या. भाजपाला सत्तांतर करता आले नसले तरी त्यांनी दहा हजार मतं घेऊन आपले चार उमेदवार आणले आहेत हे विसरता कामा नये. परंतु खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना पण भाजपा सत्तेत येईल याची प्रचंड धास्ती होती. म्हणूनच चार जागांनी काय फरक पडणार नाही या खुशीत सौ. शीतलदेवी व धैर्यशील मोहिते या दोघा पती-पत्नींनी आनंदाच्या भरात डान्स केला. त्यांचा आनंद, त्यांचा डान्स त्यांना लखलाभ! मात्र यानिमित्ताने सभांमधून आपल्या शब्दास्त्रांनी धैर्यशील यांना घायाळ करणाऱ्या घातक रामभाऊ सातपुते यांनी आपले चार शिलेदार अकलूज नगरपरिषदेत पाठवून मोहिते पाटलांना चांगलेच घायाळ केले. धैर्यशील मोहिते जिंकून हरले, पण रामभाऊ सातपुते हरून जिंकले असे जनतेतून बोलले जाते. मात्र तरीही ते दूधाची तहान ताकावर भागवत असल्याचे दिसत आहे. ज्या पध्दतीने अकलूज गेस्ट हाऊसमध्ये रामभाऊ सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच पद्धतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही? असाही प्रश्न अकलूजकरांतून उपस्थित केला जात आहे.