उत्तम जानकरांची पदयात्रा पाण्यासाठी नसून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी!
आजही स्टंटबाज उत्तम जानकर मोहिते पाटलांशिवाय स्टंटबाज अस्तित्वशून्यच..!
वसंतदादा पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे इरिगेशन खात्याचा पदभार दिल्यानंतर निरा देवधर धरणाच्या मंजुरीसाठी तीन वेळा सहीसाठी फाईल आली होती. परंतु या प्रकल्पातून माळशिरस तालुका वगळल्याने विजयदादांनी सही केली नव्हती. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री निलंगेकर यांनी वसंतदादांकडे त्यांची तक्रार केली. तेव्हा वसंतदादांनी निलंगेकर व विजयदादांना बोलावून घेतले असता विजयदादांनी सही न करण्याचे कारण सांगितल्यानंतर वसंतदादांनी निरा देवधर धरणात माळशिरस तालुक्यातील २२ गावांचा समावेश करण्यास सांगितले, तेव्हा निरा देवधर धरणाला मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पहाणाऱ्यांनी मोकळ्या हाताने द्यायचे असते. विजयदादांनी आपल्या कार्यकाळात सर्वांना भरभरून दिले. पण आता हे महाशय निरा देवधर प्रकल्पाला निधी देण्यास किती टाळाटाळ करतायत. अरे किती ही लाचारी… असे म्हणत नाव न घेता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. तर पाण्यासाठी कुठलाही संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. हा प्रकल्प विजयदादांनी उभा केल्यामुळे यासाठी कुठलाही संघर्ष करायला आम्ही तयार आहे. तर विरोधकांबद्दल बोलताना आम्ही यापूर्वी पण जागा दाखवून दिली आहे आणि यापुढेही दाखवून देऊ. येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची किंमत त्यांना कळेलच असा इशारा यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला.
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाने निरा देवधर धरण बांधले असले तरी राजकीय व प्रशासकीय उदासीनतेमुळे गेल्या तीस वर्षांपासून माळशिरस तालुक्यातील २२ गावांचा निरा देवधर पाणीप्रश्न प्रलंबित आहे. राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एकाही धरणाचे काम करायचे नाही असा स्टे दिल्यानंतर हा स्टे १५-२० वर्षांनी म्हणजेच २०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उठला. त्याचबरोबर २२ गावांना पाणी मिळावे म्हणून भाजपाने निरा देवधर प्रकल्पासाठी २५०० कोटीऐवजी फक्त २४७ कोटी मंजूर केले असले तरी त्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. मात्र आमदार असतानाही आपण अस्तित्वशून्यच असल्याची जाणीव उत्तम जानकर यांना वारंवार होत असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम जानकरांनी पदयात्रेची स्टंटबाजी केली असून आजही मोहिते पाटलांशिवाय उत्तम जानकर अस्तित्वशून्यच असल्याची जोरदार चर्चा माळशिरस तालुक्यात होताना दिसत आहे.
कुठल्या मुद्द्याचे राजकारण करायचे हे प्रत्येक राजकीय नेत्याचे कसब असते. पण राजकारण करताना कॉपी केली तर त्या नेत्याची वैचारिक दिवाळखोरीच दिसून येते. मोहिते पाटील व भाजपातील बड्या नेत्यांचे राजकीय संबंध वेगळे आहेत, कारण विजयसिंह मोहिते पाटील यांनी सलग ३५ वर्षे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असताना आज सत्तेत असलेल्या अनेक प्रमुख नेत्यांना सांभाळले आहे. त्यामुळे मोहिते पाटील हा देशपातळीवरील एक राजकीय ब्रँड आहे. पण आमदार उत्तम जानकर यांची ब्लॅकमेलर म्हणूनच प्रतिमा निर्माण झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे सहकारी माजी आमदार शहाजी पाटील यांना चक्कर येईल अशीच जानकरांनी भाजपाकडे मागणी केली होती. भाजपाला संपविण्यासाठी मोहिते पाटील-जानकर ही अनैसर्गिक युती असली तरी या युतीच्या दरम्यान आपल्या अस्तित्वाला आयाम देण्यासाठी ते मोहिते पाटलांचा पुरेपूर वापर करीत आहेत. पण मोहिते पाटील वगळता ते शून्यच आहेत हे त्यांच्या पदयात्रा समारोपाच्या वेळी प्रसिध्द झालेल्या पत्रावरून माळशिरस तालुक्यातील जनतेला कळून चुकले आहे. आपल्या पदयात्रेला प्रतिसाद मिळत नसलेला पाहून उत्तम जानकरांनी बचत गटाच्या महिलांनी कोथळ्यात उपस्थित रहावे असे पत्र काढले होते. परंतु महिला बचत गटाच्या जिल्हा समन्वयकांनी कुणीही बचत गटाच्या महिलांनी कोथळ्याला जाऊ नये असे म्हटले होते. मात्र शेवटच्या दिवशी जानकरांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना आमंत्रित केल्यामुळे पदयात्रा समारोपाच्या वेळी लोकांची मोठी गर्दी झाली. आमदार उत्तम जानकरांच्या स्टंटबाजीची माळशिरस तालुक्यात अगणित प्रकरणे आहेत, ज्यात त्यांनी लोकांच्या भावनांचा लिलाव करून आपली पोळी शेकून घेतली आहे. स्वयंघोषित पाणीदार खासदार व स्वयंघोषित दमदार आमदार म्हणून मिरविणाऱ्या भाजपातील जोडगोळीने आता निरा देवधर पाण्याचा प्रश्न सुटला अशी अफवा पसरवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला. कारण केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाचेच सरकार आहे. आमदार उत्तम जानकरांचे काय आहे? त्यांचे केंद्राचा विषय तर लांबच, महाराष्ट्र सरकारातील तर कोण ऐकणार आहे का? एकवेळ खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे संसदीय अधिवेशनात मुद्दा तरी लावून धरतील. त्यांच्याकडे बघताना संसदेतील खासदारांचा चांगला दृष्टीकोन असेल. पण उत्तम जानकरांची काय प्रतिमा आहे? आयुष्य गेले तरी ते आमदार होऊ शकले नसते. केवळ मोहिते पाटलांचा आशीर्वाद आणि ऐनवेळी भाजपातील काहींनी गद्दारी केल्यामुळे ते थोडक्या मतांनी तरी आमदार झाले. खासदार धैर्यशील मोहिते पाटील उत्तम जानकर काय स्टंटबाज आहेत काय? असे म्हणाले असले तरी सर्वांनाच माहिती आहे उत्तम जानकर हे किती मोठे स्टंटबाज आहेत. उत्तम जानकरांना पैसा आणि सत्ता याशिवाय काहीही दिसत नाही. विरोधकांचा साखर कारखाना उभारू म्हणून करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे व कै. सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन प्रशांत परिचारक यांचेकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन काही काळ शेतकरी साखर कारखाना सुरू ठेवला, पण कारखाना उभा रहात असताना त्यांनी हवेली बांधली आणि कारखाना बंद पाडला. मग गेल्या तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाण्यासाठी त्यांना २२ गावांचा अचानकच पुळका कसा आला? या पदयात्रेच्या समारोपाच्या भाषणात १०० दिवसांत २७३३ कोटींचे टेंडर काढले नाही, तर २२ गावातील १०० कार्यकर्ते सोबत घेऊन उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आमदार असले तरी केंद्रासह महाराष्ट्रातही भाजपाचे सरकार असल्यामुळे उत्तम जानकर २२ गावांचा पाणीप्रश्न सोडवू शकणार नाहीत याची त्यांनाही कल्पना आहे. तरीही त्यांनी पदयात्रेचे सोंग केले असले तरी उत्तम जानकरांची पदयात्रा पाण्यासाठी मूळीच नाही, ती पदयात्रा आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वातावरण निर्मिती करण्यासाठीच आहे अशी चर्चा माळशिरस तालुक्यात होताना दिसत आहे.