सोमनाथ हुलगे यांची धैर्यशील मोहिते पाटलांवरील केस जानकरांच्या हितासाठी की स्वतःच्या कर्जमाफीसाठी?
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): विजय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या थकीत कर्जामुळे दिनांक २१/०७/२०२२ रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतःसह आपल्या कार्यकर्ते व बॉडीगार्डमार्फत मारहाण करून डोक्याला रिव्हॉल्व्हर लावल्याचा आरोप करून सोमनाथ हुलगे यांनी त्यांच्यावर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. मात्र ती केस बी समरी करून माळशिरस कोर्टाने त्या केसमधील हवा काढून टाकली होती. तरीही सोमनाथ हुलगे यांनी दोन वर्षानंतर सचिन मोहन मोरे याला त्या घटनेचा साक्षीदार करून पुन्हा माळशिरस कोर्टात ही केस रिओपन केली आहे. वास्तविक पाहता सोमनाथ हुलगे हे आमदार उत्तम जानकरांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. तसेच त्यांचेवर सुमित्रा पतसंस्थेचे कर्ज असून त्याची केस माळशिरस कोर्टात सुरू आहे. त्यामुळे सोमनाथ हुलगे यांची धैर्यशील मोहिते पाटलांवरील केस जानकरांच्या हितासाठी की स्वतःच्या कर्जमाफीसाठी? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
सोमनाथ हुलगे यांनी सन २००३ साली विजय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था अकलूज यांचेकडून रिक्षासाठी एक लाख रूपये कर्ज घेतले होते. परंतु १९ वर्षात या कर्जदाराने फक्त २८,९३६ रूपये इतकीच रक्कम भरल्याने त्याच्याकडे १९ वर्षांच्या व्याजासह ६,५०,००० रूपये कर्ज थकीत होते. त्यापैकी सोमनाथ हुलगे यांनी दिनांक २१/०७/२०२२ रोजी विजय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे शाखाधिकारी गौरीशंकर उघडे यांचेकडे एक लाख रुपये दिले. मात्र गौरीशंकर उघडे यांनी शिवशंकर बझारच्या शेजारील ऑफिसमध्ये भैय्यांना भेटू व काही सूट देतात का ते बघू असे म्हटल्यानंतर सोमनाथ हुलगे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोमनाथ हुलगे यांना कर्ज का भरीत नाही अशी विचारणा केली असता दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली व त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. वास्तविक पाहता पतसंस्था या ठेवी व कर्जदारांनी दिलेल्या हप्त्यावरच चालत असतात. कर्जदाराने जर १९ वर्षात कर्जच भरले नसेल तर संस्थाचालक त्याची आरती करणार काय? उत्तम जानकर यांनी अकलूज पोलिस स्टेशनवर अजित पवारांचा दबाव आणून त्यावेळी धैर्यशील मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल केला. परंतु या घटनेचा मुख्य साक्षीदार नसल्याने अकलूज पोलिसांच्या तपास अहवालावरून माळशिरस न्यायालयाने ही केसच बी समरी करून टाकली. त्यानंतर सोमनाथ हुलगे यांनी साक्षीदाराचे प्रतिज्ञापत्र करून सदरची केस पुन्हा एकदा माळशिरस न्यायालयात रिओपन केली. तेव्हा काही बाबी लक्षात आल्या. सोमनाथ हुलगे यांच्यावर माळशिरस न्यायालयात सुमित्रा पतसंस्थेची केस सुरू आहे. तर विजय पतसंस्थेचे थकीत कर्जही देणे आहे. मोहिते पाटील विरोधकांना सांगायचे की, केस काढून घेण्यासाठी मला लाखो रूपये द्यायची धैर्यशील मोहिते पाटलांची तयारी आहे, पण तरीही मी माघार घेणार नाही. मात्र हा सगळा बनाव असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येते. सोमनाथ हुलगे यांच्या मताप्रमाणे मोहिते पाटलांनी विजय नागरी पतसंस्था व सुमित्रा पतसंस्थेची केस काढून घेऊन त्यांना लाखो रूपये द्यावेत असे त्यांच्याभोवतालचेच काही कार्यकर्ते चर्चा करताना दिसतात. तसेच सोमनाथ हुलगे यांची केस आमदार उत्तम जानकर यांच्या हिताचीच आहे. या केसच्या माध्यमातून ते खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना कोंडीत पकडू शकतात. तर या केसच्या माध्यमातून सोमनाथ हुलगे मोहिते पाटलांनी पतसंस्थेतील थकीत कर्जाबाबत आपल्यावर केलेल्या केसेसही काढून घेऊ शकतात. परंतु सारा खेळ साक्षीदाराच्या साक्षीवर अवलंबून आहे. त्यामुळे साक्षीदार आपल्या साक्षीवर कायम राहतोय का? आणि तो कायम राहिलाच तर सोमनाथ हुलगे यांची केस जानकरांच्या हिताची ठरेल, की स्वतःला कर्जमुक्तीसाठी या केसचा फायदा करून घेईल हे येणारा काळच ठरवेल असे जनतेतून बोलले जात आहे.