निलाजरेपणाचा कळस!
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपले बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात काम केले. त्यावेळी माळशिरस येथील प्रचारसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतरही रणजितसिंहांनी त्यांच्या सभेकडे पाठ फिरवली. तर विधानसभा निवडणुकीत साताऱ्याच्या एका आमदाराला देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण आता संपले आहे. भाजपाच्या ५० ही जागा निवडून येणार नाहीत, त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला तर मंत्री व्हाल असे म्हणून त्या आमदाराला भाजपातून फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर माळशिरस विधानसभा मतदारसंघात ना. नितीन गडकरी प्रचाराला आले असता त्यांच्याही सभेकडे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पाठ फिरवून एससीच्या बोगस दाखल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लढत असलेल्या उत्तम जानकरांना मदत करुन भाजपाचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या विरोधात काम केले. मात्र महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्यानंतर रणजितसिंह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून हा तर निलाजरेपणाचा कळसच झाला असेच म्हणावे लागेल.
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हटले जाते. तुमची कितीही सरंजामशाही असली तरी सत्तेपुढे मुजरा करावाच लागतो. रणजितसिंह नाईक निंबाळकर असो किंवा रामभाऊ सातपुते असो स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे यांच्या विरोधातील भूमिका आपण समजू शकतो. परंतु रणजितसिंह मोहिते पाटील यांनी चक्क राजकारणातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनाच संपविण्याचे स्वप्न पाहिले होते. पण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा त्यांचे कौतुक करताना ते थोडाही दम घेईनात. किती हा कोडगेपणा! २००९ पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना शरद पवारांनी मोहिते पाटलांना सर्व अधिकार देऊन पाहिले. पण यांनी आपल्यापेक्षा कुणीही मोठा होऊ नये यासाठीच प्रयत्न केल्यानंतर सर्वांनी मिळून यांचाच करेक्ट कार्यक्रम केला. जशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनमानी होती तशी भाजपामध्येही करता येईल असे मोहिते पाटलांना वाटत होते. मात्र त्यांचे लाड करण्याइतकी भाजपा मूळीच दुबळी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघात उमेदवार देताना रामभाऊ सातपुते यांच्यासारखा मोहिते पाटलांची सरंजामशाही मोडीत काढणाराच दिला. म्हणून तर रामभाऊ सातपुते डोक्यात गेले आणि एससी समाजात घुसखोरी करणाऱ्या उत्तम जानकरांना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आमदार केले. शरद पवारांच्या पक्षात पुन्हा गेलो तर पहिल्यासारखे दिवस येतील असे मोहिते पाटलांना वाटत होते. मात्र घर फिरले की घराचे वासेही फिरतात. शरद पवारांनीच मोहिते पाटलांचा पध्दतशीर कार्यक्रम केला आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधातील बरेच पुरावे देऊन रामभाऊ सातपुते यांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीनंतर रणजितसिंहांनी भाजपा पक्षश्रेष्ठींंचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे. जेव्हा गरज होती तेव्हा बसले तुतारी वाजवत, आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांचे भाजपाप्रती प्रेम उफाळून यायला लागले आहे. मात्र भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष असल्याने चुकीला माफी नसणारच! तरीही ‘झाले गेले विसरून मज माफ करावे’ असे म्हणत रणजितसिंह मोहिते पाटील भाजपा पक्षश्रेष्ठींसमोर साष्टांग दंडवत घालत असल्याचे पाहून हा तर निलाजरेपणाचा कळसच झाला हे मात्र नक्की!
गौतम भंडारे , संपादक, साप्ताहिक बंडखोर, मो. 7498827350/9529602295