कर्जबाजारी मोहिते पाटलांचा कारखाना विकत घेऊन बबनदादांनी आपली लायकी सिध्द केलीय
माढा (बंडखोर वृत्तसेवा): राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अभिजीत पाटलांचा प्रचार करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बबनदादा शिंदे यांचेवर तोंडसुख घेताना म्हणाले की, तुमची लायकी नसल्यामुळेच तुम्हाला मंत्रीपद मिळाले नाही. मात्र आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी मंत्रीपद मिळविणे हा गौण विषय आहे. त्यांनी कारखान्यामागून कारखाने उभे करून हजारो युवकांना, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या देऊन सक्षम बनवले. परंतु ज्या बबनदादा शिंदे यांची जिरविण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी करकंबमध्ये विजय शुगर कारखाना सुरू केला त्याच बबनदादांनी कर्जबाजारी झालेल्या मोहिते पाटलांचा कारखाना विकत घेऊन आपली लायकी सिध्द केलीय असे माढा तालुक्यातील जनतेतून बोलले जात आहे.
वास्तविक पाहता बबनदादा शिंदे हे शांत, संयमी आणि समाधानी आहेत. एकदा शरद पवारांनी कुर्डूवाडीच्या सभेमध्ये बबनदादांचे कौतुक करताना म्हटले होते की, बारामतीपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली आणि सिंचनाखाली कुठली असेल तर ती माढा तालुक्यातील आहे. अशा पध्दतीचे कर्तृत्व आमदार बबनदादा शिंदे यांचे आहे असे म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आमदार बबनदादा शिंदे यांची पाठ थोपटली होती. ज्यावेळेस धैर्यशील मोहिते पाटील प्रचंड कर्जबाजारी झाले, करकंबमधील कारखाना त्यांना चालवता आला नाही. त्यावेळेस डीसीसी बँक, तसेच इतर बँकांनी वसुलीसाठी जोर लावला. तेव्हा कारखाना कुणी विकत घेतला तर माढ्यातील शिंदे बंधूंनी विकत घेतला. कारखाना कोण विकतो, तर जो कर्जबाजारी असतो तो. धैर्यशील मोहिते पाटलांनी करकंबला विजय शुगर हा एक कारखाना बबनदादांची जिरविण्यासाठी सुरू केला, पण स्वतःचीच जिरली हे एक कटूसत्य आहे. म्हणजेच लायकी कुणाची आहे व कुणाची नाही हे या प्रसंगातून दिसून येते हे ओळखून घ्यावे असे परिसरातून बोलले जातंय. आणि स्वतःच्या वडिलांच्या वयाच्या माणसाला बोलताना सुसंस्कृतपणा, संस्कार पाळायचे असतात. परंतु धैर्यशील मोहिते पाटलांनी ज्येष्ठ नेते बबनदादा शिंदे यांचेवर खालच्या पातळीवर टीका केल्याने माढा तालुक्यातील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ज्या बबनदादा शिंदे यांच्यामुळे ते खासदार झाले त्यांच्याबद्दलच इतकी मग्रूरीची भाषा असेल तर सर्वसामान्यांबद्दल खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची काय भाषा असेल? अशीही चर्चा जनतेतून होताना दिसत आहे.