उत्तम जानकर यांच्या आमदारकीला शिवरत्नवरूनच सुरुंग?
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे काम करणार?
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार करण्यासाठी मोहिते पाटलांनी उत्तम जानकरांशी हातमिळवणी केली. तेव्हा जानकरांनी शरद पवार व जयंत पाटील यांच्यासमोर मोहिते पाटलांकडून माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार करण्याचा शब्द घेतला. त्यास शरद पवारांनीही अनुमती दिली. परंतु “गरज सरो आणि वैद्य मरो” या म्हणीप्रमाणे खासदारकीपुरता वापर करून मोहिते पाटलांनी उत्तम जानकरांच्या आमदारकीलाच सुरूंग लावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात असल्याची चर्चा माळशिरस तालुक्यात होताना दिसत आहे. तर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधानपरिषद अजूनही रद्द न झाल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्यावरील संकट टाळण्यासाठी त्यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपाला आमदार निवडून देण्याचे अभिवचन दिल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समजते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तम जानकर हे मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणूनच ओळखले जात होते. मात्र आमदारकीच्या अमिषाला बळी पडून उत्तम जानकरांनी मोहिते पाटलांशी जुळवून घेतल्यानंतर ‘जिकडे खोबरे तिकडे चांगभले’ या जानकरांच्या भूमिकेमुळे पारंपारिक मोहिते पाटील विरोधकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. त्यामुळे ‘ना घर का ना घाट का’ अशी उत्तम जानकरांची अवस्था झाली आहे. कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मलाच आमदारकी मिळावी हे उत्तम जानकरांनी मोहिते पाटलांकडून वदवून घेतले असले तरी जानकरांना आमदार करण्यास मोहिते पाटलांना कसलाही रस नसल्याचेच दिसून येते. माळशिरस तालुक्याचे राजकारण ठरविणारे जयसिंह मोहिते पाटील यांनीही कधी उत्तम जानकरांना मी आमदार करणार असे वक्तव्य केले नाही. जानकरांनी त्यांच्या माणसांची नावे सुचवावीत, आम्ही त्यांना आमदार करू असेच जयसिंह मोहिते पाटील म्हणाले आहेत. कारण उत्तम जानकर आमदार झाले तर माळशिरस तालुक्यात आपले काहीच ठेवणार नाहीत अशी भीती मोहिते पाटलांच्या मनात आहेच. रामभाऊ सातपुते यांच्यासारख्या आयात आमदारांनी मोहिते पाटलांच्या नाकीनऊ आणले होते. रामभाऊ माळशिरस तालुक्याचे आमदार असताना त्यांनी माळशिरस पूर्व भागात लक्ष घालू नये यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यावर वारंवार दबाव आणला जात होता. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आमदार रामभाऊ सातपुते व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात दोन तीनवेळा चांगलेच वाजल्याचीही चर्चा आहे. बीडवरून माळशिरस तालुक्यात आयात केलेले आमदार रामभाऊ सातपुते मोहिते पाटलांना सहन होत नव्हते. तर मग उत्तम जानकर कसे सहन होतील? उत्तम जानकर यांनी तर गेल्या २० वर्षांपासून मोहिते पाटलांच्या विरोधात काम केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या नाकीनऊ आणले होते. मग आमदार झाल्यावर ते मोहिते पाटलांचे काय करतील? उत्तम जानकर हे किती संधीसाधू आहेत हे मोहिते पाटलांनाही चांगलेच माहिती आहे. त्यामुळे उत्तम जानकरांनी आमदारकीसाठी मोहिते पाटलांना दिलेल्या शब्दावरून कितीही मस्का लावला तरी मोहिते पाटील त्यांना आमदार करून स्वतःच्या पायावर मूळीच धोंडा मारून घेणार नाहीत. आणि शरद पवारांमुळे उत्तम जानकरांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मिळालीच तर विरोधकांना किंवा एखाद्या अपक्ष उमेदवाराला मदत करून मोहिते पाटील जानकरांचा पराभव करणारच! त्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नसेल. नाहीतर मग उत्तम जानकर आमदार झाल्यावर मोहिते पाटलांचे ते तालुक्यात काही ठेवणार नाहीत अशी माळशिरस तालुक्यात चर्चा आहे. शरद पवार यांच्या मध्यस्तीने उत्तम जानकरांनी मोहिते पाटलांकडून आमदारकीचा शब्द घेतला असला तरी एकीकडे पक्ष म्हणून ते जानकरांना उमेदवारी देतील. त्यांच्यासोबत फिरतीलही. मात्र ऐनवेळी मतदारांचा कल नव्हता असे म्हणून मोहिते पाटील उत्तम जानकरांच्या आमदारकीला सुरूंग लावतील हे मात्र नक्की अशा प्रतिक्रीया राजकीय जाणकारांतून उमटत आहेत. तसेच उत्तम जानकरांची व मोहिते पाटलांची अनैसर्गिक युती मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनाही खटकत असल्याने जानकरांनी माळशिरस विधानसभा लढवलीच तर जानकरांचा पराभव अटळ आहे असे जनतेतून बोलले जात आहे.