भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आंबेडकरी चळवळीची ढाल करू नये!
डॉ. भगवान पवार यांचेकडून काही लोकांना हाताशी धरून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न
पुणे (बंडखोर वृत्तसेवा): कुठलाही भ्रष्ट अधिकारी अडचणीत आला की, आपल्या कातडी बचाऊसाठी आंबेडकरी चळवळीचा आधार घेत असतो. काही लोकांना हाताशी धरून शासन, प्रशासनावर दबाव निर्माण करीत असतो. मात्र त्याचे आंबेडकरी चळवळीसाठी काय योगदान असते, तर शून्य! आजपर्यंत डॉ. भगवान पवार यांनी मागासवर्गीय समाजासाठी काय योगदान दिले आहे? केवळ आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी अर्ज करून सरकारवर आंबेडकरी चळवळीतील व इतर लोकांना सोडले आहे, मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आंबेडकरी चळवळीची ढाल करू नये असा सूर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांतून निघत आहे.
डॉ. भगवान अंतू पवार यांचेवर आर्थिक भ्रष्टाचार, लैंगिक छळ आदी तक्रारी असल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याकाळात चौकशी निःपक्षपातीपणे व्हावी यासाठी नंदुरबार येथे मुख्यालय देण्यात आले आहे. दरम्यान डॉ. भगवान पवार यांच्याविरोधात कंत्राटी कामगार महिलांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्याशिवाय अनियमित कामकाज, अधिकारी-कर्मचाऱ्यांशी अरेरावी, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणे यासह आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप शासनास प्राप्त झाले आहेत. म्हणूनच आरोग्य सेवा आयुक्तालयाने २९ एप्रिल २०१४ रोजी सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. पवार यांच्याविरूध्दच्या गंभीर चौकशीचे स्वरुप पाहता निष्पक्ष चौकशी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ (१) (अ) मधील तरतुदीनुसार त्यांचे निलंबन करणे आवश्यक आहे अशी शिफारस समितीने केली होती. त्यानुसार त्यांचे निलंबन करण्यात आले. मात्र या भ्रष्ट डॉ. भगवान पवार यांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळख असलेल्या पुणे मनपातच ठाण मांडून बसण्यासाठी काहीजणांना हाताशी धरून शासनावर दबाव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आपण अडचणीत आल्यावर मागासवर्गीय म्हणून जातीचा वापर करून आंबेडकरी चळवळीचा आधार घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वास्तविक पाहता मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार झाल्यावर जातीयवाद्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी एट्रोसिटी कायदा अंमलात आणला आहे. मात्र त्याच्या गैरवापरामुळे या कायद्याचीच बदनामी होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचेवर एट्रोसिटी एक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या कार्यकर्त्यानी याचे भान ठेवावे. काही लोकांसाठी डॉ. भगवान पवार चांगलेही असतील, मग हे लोक त्यांच्या आर्थिक घोटाळ्याचे व कंत्राटी महिलांच्या लैंगिक शोषणाचे समर्थन करणार का? अशा भ्रष्ट व कथित लंपट अधिकाऱ्यांना केवळ आपण अडचणीत आल्यावरच आंबेडकरी पक्ष, संघटना दिसत असतात, त्या पण ठराविकच. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन व एट्रोसिटीची धमकी देऊन आंबेडकरी चळवळीला बदनाम करू नये असे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.