खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर होयबा प्रवृत्तीचे नसल्यामुळेच मोहिते पाटलांचा तीव्र विरोध!
माढा (बंडखोर वृत्तसेवा): मोहिते पाटलांची राजकीय पिछेहाट झाल्यानंतरही मतांच्या जोरावर ते लोकप्रतिनिधींना आपल्या तालावर नाचविण्याचे काम करीत आहेत. मात्र सगळेच सारखे नसतात, कोणीतरी वरचढ भेटतच असतो. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्या मापदंडातील लोकप्रतिनिधी नसून रावडी लोकप्रतिनिधी आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ते जनतेच्या प्रश्नांसाठी कटीबद्ध आहेत. इतरांप्रमाणे ते होयबा प्रवृत्तीचे नाहीत. म्हणूनच मोहिते पाटील यांचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तीव्र विरोध आहे अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.
मोहिते पाटलांची तिसरी नव्हे तर आता चौथी पिढीही राजकारणात सक्रीय झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही आमदार व खासदारांना आपल्या अधिपत्याखाली ठेवणे हे मोहिते पाटील यांच्या चांगलेच अंगवळणी पडले आहे. सध्या त्यांची राजकीय पिछेहाट झाली असली तरीही पूर्वीप्रमाणेच लोकप्रतिनिधींनी आमच्या इशाऱ्यावरच काम करावे असे त्यांना वाटत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पूलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने त्यांचा पूर्वीप्रमाणे वचक राहिला नाही. एकीकडे २००९ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला, तर दुसरीकडे माढ्यातून शरद पवार खासदार झाले. यादरम्यान शरद पवार हे पक्षश्रेष्ठी असल्यामुळे ते काही बोलू शकले नाहीत. मात्र २०१४ साली ते पुन्हा इच्छुक राहिल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांतून शरद पवारांना तीव्र विरोध झाला आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघ २००९ साली एससी प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. मात्र आपल्या हक्काच्या माढा लोकसभा मतदारसंघातून २०१९ ला रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण पक्षांतर्गत तीव्र विरोधामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांना उमेदवारी न देता पक्षश्रेष्ठींनी फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचे मोहिते पाटलांना आदेश दिले. यादरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले, मात्र ते राजघराण्यातील असल्यामुळे कुणाच्याही बंधनात न राहता सर्वांसाठी काम करु लागले. मोहिते पाटलांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना न विचारता काम करण्याचा प्रकार कधीही घडला नव्हता. त्यामुळे मोहिते पाटलांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एक नंबरचे शत्रू वाटू लागले. म्हणूनच त्यांना तीव्र विरोध करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभेच्या मैदानात उतरविले अशी सोलापूर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.