विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, सामान्य प्रशासन उपायुक्त सचिन इथापे यांच्या कथित भ्रष्टाचाराची ईडीमार्फत चौकशी करुन पुणे जिल्ह्याबाहेर बदली करावी
अधिकाऱ्यांच्या मनमानी भ्रष्ट कारभाराला वैतागलेल्या सामान्य पुणेकरांतून तीव्र प्रतिक्रिया
पुणे (बंडखोर वृत्तसेवा):
विभागीय आयुक्त सौरभ राव हे मागील सात ते आठ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातच कार्यरत असून त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त या पदाचा कार्यभार सांभाळूनही पुन्हा पुण्यातच विभागीय आयुक्त म्हणून नेमणूक मिळविलेली आहे. तर पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, सामान्य प्रशासन उपायुक्त सचिन इथापे हे सुद्धा वरिष्ठांची मर्जी सांभाळून पुण्यातच ठाण मांडून बसले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना पुण्यातच नेमणुका का पाहिजेत? तसेच त्यांना पुण्यातच नेमणूक कशा मिळतात? असा संतप्त प्रश्न उपस्थित करून विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व सामान्य प्रशासन उपायुक्त सचिन इथापे यांच्या भ्रष्टाचाराची ईडी व इतर तपास यंत्रणांमार्फत चौकशी करुन त्यांची पुणे जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी अशी या अधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्ट कारभाराला वैतागलेल्या सर्वसामान्य पुणेकरांतून मागणी होत आहे.
पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यापूर्वी पीएमआरडीए येथे आयुक्त म्हणून कार्यरत होते. तेथे तीन वर्षे सेवा केल्यानंतर पुन्हा त्यांनी भ्रष्टाचारी कार्यपद्धतीने पुणे महानगरपालिका येथे आयुक्त म्हणून नेमणूक मिळविल्याची चर्चा आहे. तर अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे हे पूर्वी जालन्याला जिल्हाधिकारी म्हणून होते. त्यापूर्वी ते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर येथे कार्यरत होते. येथेही यांनी भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातलेले आहे व अनेक भ्रष्टाचार केल्याचे बोलले जात आहे. पुणे महानगरपालिका येथेही त्यांनी अनेक भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातलेले दिसून येत आहे. त्याचबरोबर सामान्य प्रशासन उपायुक्त सचिन इथापे यांच्या कार्यकाळात अनेक बोगस बदली, पदोन्नती व भरती झालेल्या आहेत. यापूर्वी ते वखार महामंडळ पुणे येथे कार्यरत होते. भ्रष्टाचारी कार्यपद्धतीमुळे सचिन इथापे यांची पुन्हा पुणे जिल्ह्यातच क्रीमी पोस्टिंग म्हणून थेट उपायुक्त सामान्य प्रशासन या पदावर नेमणूक झालेली आहे अशी मनपा परिसरात आलेल्या पुणेकरांनी माहिती दिली. त्यामुळे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, सामान्य प्रशासन उपायुक्त सचिन इथापे यांच्या या कथित भ्रष्टाचाराची व मनमानी कारभाराची ईडी व इतर तपास यंत्रणांमार्फत चौकशी करुन पुणे जिल्ह्याबाहेर त्यांची बदली करावी अशी सर्वसामान्य पुणेकरांतून तीव्र मागणी होत आहे.