पथ विक्रेत्यांना अमानुष व बेकायदेशीर मारहाण व तक्रारदारांवर अन्याय करणाऱ्या माधव जगतापवर आयुक्त विक्रमकुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांचा वरदहस्त कशासाठी?
आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त माधव जगताप यांची कोरेगाव पार्क लेन ७ आणि पौड फाटा मुळशी येथे १०० करोड रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता आहे अशी तक्रार तुषार गाडे यांनी केली होती म्हणून त्यांना मारहाण केली. याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल होऊन दिला नाही.
पुणे (बंडखोर वृत्तसेवा): पुणे मनपा उपायुक्त श्री माधव जगताप यांचा पथ विक्रेत्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होऊनही त्यांच्यावर आयुक्त विक्रम कुमार यांनी कसलीही कारवाई न करता त्यांची पाठराखण केली. त्यामुळे माधव जगताप यांनी पुनश्च एकदा पथ विक्रेत्याला मारहाण केली. तर पुणे महापालिकेत अतिक्रमण विभागात तक्रार घेऊन येणाऱ्या अनेक नागरिकांना ते त्रास देतात. काही महिनापूर्वींच दिनेश खराडे यांच्यावर त्यांनी ३५३ चा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. अशाप्रकारे पथ विक्रेत्याला मारहाण करण्याबरोबरच ते तक्रारदारांवरही अन्याय करीत असल्याने माधव जगताप हे गुंड आहेत की अधिकारी? अशा प्रतिक्रिया पुणेकरांतून उमटत असून गुंड प्रवृत्तीच्या माधव जगतापवर आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांचा वरदहस्त कशासाठी? तर फक्त भ्रष्टाचार व हप्ते घेण्यासाठीच का? असा संतप्त प्रश्न पुणेकरांसह सेवकांतून उपस्थित केला जात आहे. उपायुक्त माधव जगताप हे शरद पवारांचे विश्वासू सहकारी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व म्हाडाचे तत्कालीन अध्यक्ष श्री विजयराव कोलते यांचे भाचे आहेत असे समजते. म्हणूनच उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार माधव जगताप प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नाहीत असा पीडितांतून आरोप केला जात आहे. उपायुक्त माधव जगताप यांना अतिक्रमण विभागाचे कामकाज योग्यप्रकारे करता येत नाही असे त्यांचेच काही सहकारी व कर्मचारी वेळोवेळी पत्रकारांना सांगत असतात. त्यामुळे माधव जगताप यांचेकडील उपायुक्त दर्जाची अनेक खाती विक्रम कुमार यांनी त्यांना कोणाच्या शिफारशी वरून दिली असे प्रश्न पुणे मनपातील अधिकारी, कर्मचारी व युनियनच्या पदाधिकाऱ्यांतून विचारले जात आहेत. माधव जगताप यांच्यावर २०१६-२०१७ च्या कार्यकाळात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी मा. हायकोर्टात देखील त्या शोषित महिलेला त्रास दिला असून हायकोर्टातील ३ वकील फोडण्याचे काम केले आणि त्या शोषित महिलेला २२ लाख रुपये दिले आहेत. विशाखा समिती पुणे महानगरपालिका याठिकाणी त्यांची केस अद्यापही प्रलंबित आहे अशी सेवकांतून माहिती मिळत आहे. त्याचबरोबर माधव जगताप यांनी सदाशिव पेठ याठिकाणी एक वाडा खरेदी केल्याचेही यावेळी बोलताना काही सेवकांनी सांगितले. तसेच अतिक्रमण विभागाच्या वसुलीचे काम कलंकित सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक श्री अभिमन्यू अर्जुन गाडे यांच्याकडे सोपविलेले आहे. गाडे यांच्यावर देखील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे ३ गुन्हे दाखल आहेत. मग त्यांना मदत कोणत्या खासदारांनी असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान अतिक्रमण विभाग, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, परवाना आणि आकाशचिन्ह विभाग, सुरक्षा विभाग, पर्यावरण विभाग, बीओटी विभाग, तांत्रिक विभाग, मंडई विभाग या खात्यांचा पदभार जगताप यांना दिलेला आहे याचा अर्थ काय? की अर्थ पूर्ण हप्ते? हे पुणेकरांनी समजावे. या अधिकाऱ्यांना प्रशासक विक्रम कुमार आणि रवींद्र बिनवडे यांनी मारहाण करण्याचा अधिकार दिलाय काय? असा सवाल पुणेकरांतून उपस्थित केला जात आहे.