Back To Top

April 3, 2026

तीन तालुक्यात जय महाराष्ट्र म्हणायला माणूस ठेवणार नाही

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याची वल्गना……

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा ): शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आपल्या अकलेचे तारे तोडत तीन तालुक्यात जय महाराष्ट्र म्हणायला माणूस ठेवणार नाही अशी वल्गना करत मला शिंदे गटात प्रवेश द्यावा अशी विनंती केल्याची व स्वतःचा बायोडाटाही शिंदे गटाच्या नेत्याकडे दिल्याची विश्वसनीय माहिती शिवसैनिकांना मिळाली आहे.
गेली दोन-तीन वर्षे हा पदाधिकारी शिंदे गटाच्या नेत्यांचे उंबरठे झिजवत आहे. परंतु अजून तरी त्याचा पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला नाही.
स्वतःला कट्टर निष्ठावान समजणाऱ्या या बोलघेवड्या पदाधिकाऱ्याने शिवसेना स्वतःची पार्टी असल्याच्या अविर्भावात वावरुन अनेक मातब्बर लोकांचे पक्ष प्रवेश जाणूनबुजून थांबवले. शिवसेना कशी संपवायची याची सुपारीच या बहाद्दराने घेतल्याचं वारंवार सिद्ध होवूनही वरीष्ठ मूग गिळून गप्प आहेत.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्क्रियतेला सर्वस्वी हाच पदाधिकारी जबाबदार असल्याचे खालपासून वरपर्यंत सर्वांना ज्ञात असूनही त्याला वेळोवेळी अभय दिले जात आहे.
निष्ठावान कट्टर शिवसैनिकांना बाजूला सारून संघटनेची प्रतारणा करणारांना जवळ करून त्यांना पदावर नेमून जुन्या निष्ठावान शिवसैनिकांवर अन्याय करणाऱ्या या घर का भेदीला कार्यमुक्त करून निष्ठावानाला संधी दिली गेली पाहिजे अशी या विभागातील शिवसैनिकांची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
शिंदे गटात जाण्यासाठी उतावळा असणारा हा पदाधिकारी गेल्या दोन वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. परंतु त्याचा पूर्व इतिहास पाहता शिंदे गटातूनच त्याला विरोध होत आहे. त्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीला वैतागून शिंदे सेनेत गेलेल्या शिवसैनिकांचाच त्याच्या पक्ष प्रवेशाला अडसर निर्माण झाला असल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती सध्या या पदाधिकाऱ्याची झाली आहे.
मांजर डोळे मिटून दूध पिते याचा अर्थ जग दुनिया आंधळी आहे असा होत नाही हे त्या पदाधिकाऱ्याला माहीत नसेल तर नवलच!
एकूणच जय महाराष्ट्र म्हणायला माणूस ठेवणार नाही ही वल्गना
वल्गनाच ठरणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज लागणार नाही….!

Prev Post

तीन तालुक्यात जय महाराष्ट्र म्हणायला माणूस ठेवणार नाही

post-bars

Leave a Comment