पोलिस प्रशासनाने आंबेडकर जयंतीत डॉल्बीला विरोध केल्याने भीमसैनिकांतून तीव्र नाराजी
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा ): जगभरात साजरी होणारी आंबेडकर जयंती ही भीमसैनिकांसाठी दिवाळीसारखीच असते. या निमित्ताने दोन महिने अगोदर पासूनच भीमसैनिक आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी करीत असतात. तेव्हापासूनच भीम जल्लोषाचा माहोल तयार झालेला असतो. परंतु सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी बंदी केल्यामुळे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मीटिंगमध्ये अकलूजचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी आंबेडकर जयंतीत कोणीही डॉल्बी वाजवू नये, आणि काही मंडळांनी अकलूजमध्ये डॉल्बी आणण्याचा प्रयत्न केला तर त्या डॉल्बीला आम्ही गावातही पोहोचू देणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भीमसैनिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.
सोलापूर शहर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी साजरी होणारी आंबेडकर जयंती पाहण्यासाठी महाराष्ट्रातून भीमसैनिक येत असतात. या शहरातील मिरवणुकीत जवळजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 450 मिरवणुकीचे रथ असतात. म्हणूनच सोलापूर शहरातील आंबेडकर जयंती महाराष्ट्रात एक नंबरवर असते. त्यामुळेच या जयंतीचे महत्त्व कमी करण्यासाठी सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने डॉल्बी बंदीचा निर्णय घेतला नसेल ना? असे प्रश्न भीमसैनिकांतून उपस्थित केले जात आहेत. सुप्रीम कोर्टाने डॉल्बी संदर्भात लागू केलेली नियमावली दाखवून पोलीस प्रशासन डॉल्बीला विरोध करत असले, तरी सोलापूर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात धुमधडाक्यात डॉल्बी सुरू आहे. मग सोलापूर जिल्ह्यातच डॉल्बी बंदीचा अट्टाहास कशासाठी? डॉल्बी ही कानासाठी खूपच घातक आहे, यामुळे हृदयविकाराचे झटके येऊन माणसे दगावण्याची शक्यता आहे अशी कारणे देऊन पोलीस प्रशासनासह काही नेतेही डॉल्बीला विरोध करीत असतात. पण पोलीस प्रशासनासह काही नेते खरंच जनतेच्या भल्याचा विचार करीत असतील तर मग अवैध धंद्यांमुळे जनतेची प्रगती होते का? असा प्रश्न पडतो. डॉल्बीच्या नियमावलीची जितक्या तत्परतेने पोलीस प्रशासन अंमलबजावणी करताना दिसून येते, तितक्याच तत्परतेने पोलीस अवैध धंद्यांवर कारवाई का करीत नाहीत?
आजपर्यंत आंबेडकर जयंतीत कधीही वादविवाद झालेले नाहीत. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत महिलाही मोठ्या संख्येने सामील होत असतात. त्यामुळे भीमसैनिकांची एक फळी या मिरवणुकीचे कवचकुंडल बनून सर्वांचे संरक्षण करत असते. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाचीही आवश्यकता भासत नाही, इतके सक्षम भीमसैनिक असतात. आंबेडकर जयंती हा भीमसैनिकांसाठी दिवाळीसारखा मोठा सण असल्यामुळे या दिवशी सर्व समाज बांधव डॉल्बीच्या तालावर थिरकून आपला आनंद व्यक्त करीत असतात. नाचून आनंद व्यक्त करणे हा गुन्हा आहे का? पोलीस प्रशासन म्हणतंय की बँजो पार्टी वाजवा, पारंपारिक वाद्य वाजवून जयंती साजरी करा, पण आता पारंपारिक वाद्य कुठे राहिलीत? कुणी कुठल्याही नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नाही हे सर्वांनी मान्यच केले पाहिजे. म्हणून सर्व नियम मोडावेत असे नाही. पण यातून एक मध्यम मार्ग निघू शकतो. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने दोन टॉप व दोन बेसची परवानगी देऊन भीमसैनिकांना 14 एप्रिलच्या दिवाळीचे गिफ्ट द्यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आम्ही वाचतो पण, आणि 14 एप्रिलला नाचतो पण… त्यामुळे कुणी तत्त्वज्ञान शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. 14 एप्रिल हा आमचा दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करू द्या असा सूर भीमसैनिकांतून निघत आहे.