डीवायएसपी शिरगावकर व पोलिस निरीक्षक निंभोरे यांच्याकडून कर्तव्यात कसूर
कायदेशीर कारवाई करण्यासाठी गौतम भंडारे यांचे २ मे ला एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): एट्रोसिटी या विशेष कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रोहन पवार यास चौकशीकामी ताब्यात घेणे गरजेचे असताना तो खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा निकटवर्तीय असल्याने त्यास पाठीशी घालणाऱ्या डीवाएसपी नारायण शिरगावकर व लेखनिक पोलिस निरीक्षक गणेश निंबाळकर यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांचेवर कडक कारवाई करण्यासाठी व गुटखा माफिया दिलीप मस्केला वाचवून कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचेसह संबंधित पोलिस कर्मचारी व गुटखा माफियासह त्याच्या पत्नीचे सीडीआर तपासून यांचीही खातेनिहाय चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी २ मे २०२५ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक सोलापूर (ग्रामीण) यांच्या कार्यालयासमोर गौतम भंडारे आपल्या सहकाऱ्यांसमवेत धरणे आंदोलन करणार आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बंडखोर या वेब पोर्टलवर संपादक गौतम भंडारे यांनी पोस्ट केलेल्या ‘काय होतास तू, काय झालास तू!’ या संपादकीय लेखावरती रोहन पवार याने आत्मसन्मानास ठेच पोहचवून अपमानास्पद कमेंट टाकल्याप्रकरणी त्याच्यावर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (r), ३ (२) (va) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याच्या कामी एट्रोसिटी अंतर्गत (विशेष कायद्याप्रमाणे) गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास चौकशीकामी ताब्यात घेणे व आरोपीकडे चौकशी करणे गरजेचे असताना संबंधित पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व त्यांच्या कार्यालयातील लेखनिक पोलिस निरीक्षक गणेश निंबाळकर हे दोघेही संबंधित आरोपी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा निकटवर्तीय असल्याने त्यास पाठीशी घालत आहेत, अभय देत आहेत. आरोपीकडे कोणतीही चौकशी केली नाही, त्यास अटक केली नाही. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ३५ चे कायदेशीर तरतुदींचे पालन केले नाही.
मा. सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना अटक करण्याबाबत अरनेश कुमार केसमधील दिलेल्या मार्गदर्शक तत्वातील जी चेकलिस्ट आहे त्याप्रमाणे प्रस्तुत गुन्ह्यातील आरोपीला अटक होणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक संबंधित पोलिस अधिकारी त्याला सहकार्य करीत आहेत. आरोपीला मदत व्हावी याकरिता सदर गुन्ह्याचा संथ गतीने तपास करीत आहेत. तसेच एट्रोसिटी एक्ट हे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना अत्याचारापासून प्रतिबंधित करणारा कायदा असल्याने सदर कायद्याचा धाक जातीयवादी समाजकंटकावर राहण्यासाठी प्रस्तुत विशेष कायद्यातील तरतुदीप्रमाणे आरोपींना अटक करणे गरजेचे व आवश्यक असताना तपासीय अधिकारी डीवायएसपी नारायण शिरगावकर व लेखनिक पोलिस निरीक्षक गणेश निंबाळकर हे आरोपी मोहिते पाटलांचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याने त्यास अभय देऊन पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज कार्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्यापपर्यंत एट्रोसिटी या विशेष कायद्यातील दाखल झालेल्या अनेक अनेक एट्रोसिटीच्या केसमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज यांच्या कार्यालयामार्फत समरी अहवाल दाखल करून चुकीच्या पध्दतीने एट्रोसिटी केसेस निकाली काढण्यावरती उपविभागीय पोलिस अधिकारी यांचा भर दिसून येत आहे. तसेच अनेक एट्रोसिटी केसेसमध्ये जाणीवपूर्वक अटक करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या सर्व बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी व डीवायएसपी नारायण शिरगावकर आणि लेखनिक पोलिस निरीक्षक गणेश निंबाळकर यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांचेवर कारवाई होण्यासाठी गौतम भंडारे २ मे २०२५ रोजी धरणे आंदोलन करणात आहेत. तसेच अकलूज पोलिस स्टेशनने २२ नोव्हेंबर २०२४ रोजी ज्या अवैध गुटखा मालाची वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई केली तीच गाडी टेंभुर्णी पोलिसांनी पकडली. मात्र ज्या पध्दतीने टेंभुर्णी पोलिसांनी गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या त्या पध्दतीने अकलूज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी त्यांच्या मुसक्या न आवळता फक्त ड्रायव्हर सुनील बळी चंदनशिवे याच्यावर कारवाई करून त्यांना अभय देण्याचे काम केले. परंतु सदरचा गुटखा माल कुणीकडे चालला होता? तो कुठून आला होता? आणि या गुटखा मालाचा मुख्य मालक कोण होता? याचा योग्यरित्या तपास न करता गुटखा मालाचे मुख्य मालक दिलीप रामचंद्र मस्के यांना वाचवून पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी कर्तव्यात कसूर केली आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक निंभोरे यांच्यासह गुटखा माफिया व त्याची पत्नी आणि पोलिस कर्मचारी अनिल शिंदे यांचे सीडीआर तपासावेत व पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोलापूर (ग्रामीण) कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम भंडारे यांनी माहिती दिली.