आदिनाथच्या माध्यमातून रामभाऊंना टार्गेट! तुमचा गड उध्वस्त होतोय, मोहिते पाटलांनो इतकेही हुरळून जाऊ नका!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): शरद पवारांच्या सर्व शिलेदारांनी एकत्र येऊन करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली व ती जिंकलीही. ही लढत नारायण पाटील विरूध्द संजय शिंदे या गटामध्ये झाली असली तरी नारायण पाटील गटात जगताप गट, बागट गट व मोहिते पाटील गट सहभागी होता. एकीकडे नारायण पाटील यांच्याकडे रथी महारथी असताना संजय शिंदे यांनी एकाकी झुंज दिली. मात्र त्यांना हा कारखाना आपल्या ताब्यात घेता आला नसला तरी त्यांनी कडवी झुंज दिली. परंतु पडक्या वाड्याच्या पाटीलकीच्या या विजयी उन्मादाने मोहिते पाटील समर्थकांनी शिवरत्नचा गड उध्वस्त करणाऱ्या माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनाच टार्गेट करण्यास सुरूवात केल्याने मोहिते पाटलांनो इतकेही हुरळून जाऊ नका असा सूर माळशिरस तालुक्यातून उमटत आहे.
वास्तविक पाहता रामभाऊ सातपुते व कारखानदारीचा काडीचाही संबंध नाही. लोकांच्या दैनंदिन अडचणी सोडवून त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच रामभाऊ सातपुते यांचे काम. म्हणून तर माळशिरस तालुक्यातील जनतेने त्यांना डोक्यावर घेतले आहे. रामभाऊ सातपुते हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने जिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो तिकडे त्यांचे पाय आपसुकच वळतात. करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात मोहिते पाटलांनी विशेष लक्ष घातल्यामुळे रामभाऊ सातपुते यांनी त्याठिकाणी जाऊन मोहिते पाटलांनी विजय शुगर व विजय पतसंस्था या सहकारी संस्था कशा बुडवल्या हे तेथील शेतकऱ्यांना सांगून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मोहिते पाटलांचा गैरव्यवहार रामभाऊ सातपुते यांनी करमाळ्यातील शेतकऱ्यांसमोर मांडला ही त्यांची चूक होती का? त्याचबरोबर करमाळ्यातील सभेत रामभाऊ सातपुते यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना “चिखलाने माखलेला हाल्या अवकाळी पावसात धुवून निघाला” अशी केलेली टीका खरी नव्हे का? धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून खासदार झाले ते महाविकास आघाडीच्या लाटेतच! नाहीतर त्यांना पराभवाची धूळ चाखावीच लागली असती. जसे संदिपान थोरात लाटेतच आमदार होत होते, नेमके तसेच यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांचे झाले आहे. मग रामभाऊ सातपुते यांनी ‘चिखलाने माखलेला हाल्या अवकाळी पावसात धुवून निघाला’ असे वक्तव्य केले ते चुकीचे आहे का? पण हीच टीका मोहिते पाटलांच्या जिव्हारी लागल्याने आदिनाथ साखर कारखाना नारायण पाटील गटाने जिंकल्यानंतर संजय शिंदे यांच्याकडे मोर्चा न वळवता मोहिते पाटलांनी रामभाऊ सातपुते यांना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. काहींनी लेख लिहिले, पोस्ट केल्या, व्हिडीओ बनवले. यातून त्यांचे संस्कार काढले. पण दुसऱ्यांच्या लग्नात किती नाचायचे असते? म्हणूनच “लगीन लोकाचं आणि नाचतंय येड्या भोकाचं” अशी म्हण पडली असावी. आदिनाथ साखर कारखाना जिंकण्यासाठी नारायण पाटील यांना खरी पॉवर मिळाली असेल तर ती शरद पवारांची! तसेच त्याठिकाणी असलेल्या बागल गट व जगताप गटाची. मात्र ‘मोहिते पाटील यांचा रामभाऊ सातपुते यांनी नाद करू नये’, ‘हलक्यात घेऊ नये’ अशा ज्या वल्गना सुरू आहेत ते म्हणजे दुसऱ्याच्या मुलाला माझेच मूल म्हटल्याप्रमाणे आहे. मोहिते पाटलांकडून रामभाऊ सातपुते यांच्यावर अजून एक आरोप केला जातो की, ते आमदार असताना अकलूजमध्ये का फिरकले नाहीत? तर जेव्हा जेव्हा रामभाऊ सातपुते अकलूज परिसरात लक्ष घालत असत तेव्हा तेव्हा रणजितसिंह मोहिते पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांची तक्रार करीत असत. ना. देवेंद्र फडणवीस यांनी दोन तीन वेळा मोहिते पाटील व रामभाऊ सातपुते यांचे वाद मिटवले आहेत. पण आता ना. फडणवीस यांनी रामभाऊ सातपुते यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. संपूर्ण माळशिरस तालुका भाजपमय करण्याच्या रामभाऊंना त्यांनी सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण ताकद रामभाऊ सातपुते यांना मिळाल्याने त्यांनी मोहिते पाटलांच्या गडाला सुरूंग लावायला सुरूवात केली आहे. त्यामुळे मोहिते पाटलांना स्वप्नातही रामभाऊ सातपुतेच दिसत असल्याने आदिनाथच्या माध्यमातून त्यांनी रामभाऊ सातपुते यांना टार्गेट करायला सुरूवात केली आहे. “ये डर होना जरूरी हैं|” मोहिते पाटील व त्यांचे समर्थक रामभाऊ सातपुते यांचे संस्कार काढत असले तरी त्यांनी मोहिते पाटलांप्रमाणे कुणाला जीवनातून उठवले नाही. कधी कुणाच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावला नाही. मोहिते पाटलांच्या अन्याय अत्याचाराची मालिका लिहायला घेतली तर भलेमोठे पुस्तकच होईल. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना शरद पवाररूपी अवकाळी पावसाची साथ लाभली, नाहीतर आज त्यांचे राजकीय भवितव्य वेगळेच दिसले असते अशी चर्चा राजकीय जाणकारांतून होताना दिसत आहे.