काय होतास तू, काय झालास तू!
सत्तेचा अहंकार, अनभिषिक्त सम्राटासारखा थाट, कार्यकर्त्यांच्या नमस्काराला प्रतिसाद नाही, आपण म्हणजे जणू कलियुगातील राजेच आहोत अशा भ्रमात वावरणारे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील राजकीय साठमारीत घाईगुतीला आलेत. स्वतःच्या बचावासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील बड्या नेत्यांबरोबरच भाजपातील काही वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात चकरा मारुन ते थकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वक्रदृष्टी आणि रामभाऊ सातपुते यांच्याकडून होणाऱ्या कडव्या विरोधामुळे माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्रात आपल्याविरोधात जनमत कलुषित झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठविलेल्या अभिनंदनपर पत्राचे भांडवल करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या भूमिकेचे जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात असून रणजितसिंह यांच्याबद्दल बोलताना “काय होतास तू, काय झालास तू” असे माळशिरस तालुक्यातील जनतेतून उपरोधिकपणे म्हटले जात आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सूपुत्र असल्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील जमिनीवरून कधी चाललेच नाहीत. सत्तेच्या धुंदीत ते नेहमी वरच्या हवेतच राहिले. राजकारणात ते कर्तृत्वाच्या जोरावर नव्हे तर पित्याच्या पुण्याईने पुढे आले. कारण त्याशिवाय त्यांच्याकडे स्वकर्तृत्व असे काहीच नव्हते. सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांनी स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमनपद देऊ केले होते. परंतु आपले ज्येष्ठ बंधू विजयसिंह मोहिते पाटील यांनी माझ्या रणजितसिंहाला चेअरमन कर असे म्हणताच स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांनी मागचा पुढचा विचार न करता त्यांना बिनविरोध चेअरमन केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोहिते पाटलांची राजकीय कोंडी झाली ती पुत्रप्रेमामुळेच! विजयसिंह मोहिते पाटलांना सोलापूर जिल्ह्यातील नवनेतृत्व म्हणून रणजितसिंहांना पुढे आणायचे होते. परंतु संजयमामा शिंदे व प्रशांत परिचारक यांनी यास प्रखर विरोध केला. परिणामी त्यांना कुरघोड्यांना वैतागून राष्ट्रवादी काँग्रेस सोडावी लागली. त्यानंतर कृष्णा भीमा स्थिरीकरणाचे निमित्त करून भाजपात गेलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना तिथे तरी महाराष्ट्राचा नेता म्हणून आपण पुढे येऊ असे वाटले. मात्र तिथली पक्षशिस्त, पक्षादेश पाहून कशी काय अवदसा आठवली, असे म्हणत पाच वर्षे मोहिते पाटलांनी भाजपाला कसेतरी सहन केले. पण लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपण भाजपाचे आमदार असतानाही त्यांनी त्यांच्या उमेदवारांचे काम केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सभेकडे पाठ फिरवली. यावरुनच रणजितसिंह स्वतःला किती मोठे समजत होते हे दिसून येते. पण त्यांची सरंजामी वृत्ती, हेकेखोरपणा हेच त्यांच्या अंगलट आले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने कौल असल्याचे पाहून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी साताऱ्यातील एका नेत्याला भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले होते. विधानसभा निवडणुकीत रामभाऊ सातपुते यांच्याविरोधात काम करुन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जातचोर उत्तम जानकरांना आमदार केले. तेव्हापासून रामभाऊ सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांच्या विरोधातील पुरावे वरिष्ठांना सादर करून त्यांच्या हकालपट्टीसाठी खूप जोर लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर डोक्याने कार्यक्रम करणारे नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल या भ्रमात मोहिते पाटील वावरत होते. परंतु त्यांचे राजकीय अंदाज फेल जाऊन महाराष्ट्रात पुन्हा एकदा बहुमतांनी महायुतीचे सरकार आल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुक्ती करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांना जोरदार चपराक मारली आहे. वास्तविक पाहता रणजितसिंह मोहिते पाटील हे खूप अहंकारी म्हणूनच ओळखले जातात. आपल्या कार्यकर्त्यांशीही ते सौजन्याने वागत नाहीत असे बहुतांश कार्यकर्त्यांकडून समजते. पण सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहार, स्वतःची आमदारकी व सदाशिवनगरचा कारखाना वाचविण्यासाठी ते आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात हेलपाटे मारत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्यासाठी नागपूरातील आपल्या लोकांची ते मदत घेत असल्याचे खात्रीशीर वृत्त समजते. दरम्यान नुकतेच भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान पार पडले. यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एक हजारापेक्षा जास्त सदस्य नोंदणी केली. परंतु एका कारखान्याचे चेअरमन व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सूपुत्र असलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केवळ एक हजार सभासदांची नोंदणी केली. यादरम्यान पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना अभिनंदनपर पत्र पाठवले. मात्र त्या पत्राचे भांडवल करून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी मोहिते पाटलांचे चांगलेच संबंध असून वरिष्ठांनी रामभाऊ सातपुते यांनाच बायपास केले आहे अशी चर्चा घडवून आणली. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर राजकारणी असलेल्या मोहिते पाटलांना अभिनंदन पत्रावरून इतक्या उकळ्या फुटाव्यात हे जनतेलाच पटले नाही. एखाद्या राजपुत्रासारखे जीवन जगणाऱ्या रणजितसिंहांनी अभिनंदनपत्राने हुरळून जात कुणी कितीही प्रयत्न केले तरी आमचे व भाजपा पक्षश्रेष्ठींचे संबंध चांगले असल्याचे लोकांमध्ये बिंबविण्याचा प्रयत्न केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.