दहशतमुक्त व्हा! निर्भय बना!!
चौदा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही बंडखोरमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करीत होतो तेव्हा अनेकजण उघडपणे बंडखोर वाचायलाही घाबरत असत. मोहिते पाटील यांच्या जवळचेच बहुतांशी कार्यकर्ते पेपर स्टॉलवाल्याला बंडखोर आला की त्यांच्या नियमित दैनिक पेपरमध्ये घालून द्या असे म्हणत असत. तर अनेकजण चोरुन पेपर वाचत असत. आमचे काही मित्र व हितचिंतक आम्हाला पहाटे व रात्री व्यायामाला जाऊ नका असे काळजीपोटी म्हणत, इतकी मोहिते पाटलांची दहशत होती. पण मी एक लढाऊ भीमसैनिक असल्याने व माझ्या सोबतीला आंबेडकरी चळवळीतील अनेक लढवय्ये सहकारी असण्याबरोबरच उत्तम जानकरांसह मोहिते पाटील विरोधकही सोबत असायचे. त्यामुळे मी न डगमगता मोहिते पाटलांच्या अन्याय अत्याचाराविरोधात लेखणी चालवायचो. पण आता पूर्वीसारखे वातावरण राहिले नाही. आंबेडकरी चळवळ कुणाच्या बापाला कधी घाबरलीच नाही. मात्र २०१९ साली माळशिरस तालुक्याला आमदार म्हणून लाभलेले रामभाऊ सातपुते आता मोहिते पाटलांचा ‘काळ’ बनून त्यांच्यासमोर उभे राहिले आहेत. त्यामुळे अकलूजमध्येही मोहिते पाटील विरोधकांची प्रचंड ताकद वाढली असून आता अकलूजसह परिसरातील मोहिते पाटलांचे बळी ठरलेल्या अत्याचारपीडित लोकांनी त्यांच्या दहशतीतून मुक्त होऊन निर्भय बनले पाहिजे.
आमदारकी डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तम जानकरांनी आपले विरोधक मोहिते पाटलांशी जुळवून घेतले. तेव्हा मोहिते पाटलांचा पारंपरिक विरोधक त्यांच्यामागे गेला नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे काम करुन ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहिले. लोकसभा निवडणुकीपासून भाजपाने मोहिते पाटलांना प्रखर विरोध करायला सुरुवात केली. धैर्यशील मोहिते पाटलांचे अनेक कारनामे यादरम्यान चव्हाट्यावर आले. प्रमोद पवार खून प्रकरणात त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही केली तर धैर्यशील मोहिते पाटील यांना सोडणार नाही असा इशारा एका मुलाखती दरम्यान टीव्ही चॅनलच्या माध्यमातून दिला होता. पण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळून माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाले. तेव्हा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव होऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येईल अशी मोहिते पाटलांना स्वप्नं पडू लागली. यातूनच धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे काही कार्यकर्ते गेल्यानंतर त्यांना अपशब्द वापरण्यात आले. तर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी साताऱ्यातील एका नेत्याला आता महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही, त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात या. तुम्हाला मंत्रीपद मिळेल असे म्हणून त्यांना भाजपातून फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रात एकहाती महायुतीची सत्ता येताच मोहिते पाटलांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आणि इथूनच त्यांना हादरे बसायला सुरुवात झाली. मोहिते पाटलांच्या घरात एक खासदार व एक आमदार असताना त्यांची अवस्था बिनपगारी फूल अधिकारी या पध्दतीची झाली. पदं आहेत, पण सत्ता नाही. त्यातच भाजपाचा राम ‘काळ’ बनून पुढं उभा आहे. भाजपाकडून रामभाऊ सातपुते माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील व मुलगा विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते पाटील हे गळ्यात तुतारीचा गमजा टाकून प्रतिस्पर्धी उत्तम जानकरांचा प्रचार करीत होते. तर अकलूजला भाजपाचे मंत्री नितीन गडकरी आलेले असतानाही रणजितसिंह मोहिते पाटील त्यांच्याकडे फिरकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी रामभाऊ सातपुते पक्षश्रेष्ठींंकडे पाठपुरावा करीत आहेत. घर फिरले की घराचे वासेही फिरतात अशी एक म्हण आहे, ती शिवरत्नवरील मोहिते पाटलांना तंतोतंत लागू पडते. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाचे विधानपरिषदेचे खासदार असताना त्यांनी वारे पाहून महाविकास आघाडीला साथ दिली. तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर त्यांच्या डोक्यात चांगलीच हवा गेली. पण राजकीय साटंलोटं का असेना, २००९ पासून अडगळीत पडलेल्या मोहिते पाटलांना भाजपाने ऊर्जितावस्था मिळवून दिली. तरीही त्यांनी विरोधात काम केल्याने भाजपाने रामभाऊ सातपुते यांना मोहिते पाटलांवर मोकळे सोडले आहे. माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी अकलूजकरांना मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी अकलूजमध्ये विशेष लक्ष घातले आहे. त्यामुळे काही पीडित लोक त्यांना भेटून आपल्या व्यथा सांगत आहेत. केंद्रासह महाराष्ट्रातही भाजपाची सत्ता असल्याने रामभाऊ या सत्तेच्या जोरावर जनतेची कामे मार्गी लावत आहेत. तर मोहिते पाटलांचे अनेक घोटाळे उघडकीस आणून त्यांची दमछाक करीत आहेत. त्यामुळे मोहिते पाटील चांगलेच काळवंडले असून रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून विरोधकांसाठी चांगले दिवस यायला लागले आहेत. आजपर्यंत सत्तेच्या जोरावर मोहिते पाटलांनी अकलूजमधील आपल्या विरोधकांवर अनन्वित अन्याय अत्याचार केले. काहींना जेलमध्ये पाठवून आयुष्यातून उठवले काहींना संपवले. तर काहींना अकलूज सोडायला मजबूर केले. पण आता कुणाच्या दहशतीखाली, दबावाखाली रहायचे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा”. काहीजणांची मजबूरी असेल, त्यामुळे बरेचजण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. पण येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला ७५ वर्षे पूर्ण होतायत. तरीही अजून गुलामच रहायचे का? विचार करा, आणि जे कुणी अत्याचार पीडित असतील. दहशतीखाली वावरत असतील, त्यांनी दहशतमुक्त होऊन निर्भय बनावे. ‘राम’ सोबतच बंडखोरची धारदार लेखणीही आपल्यासोबत नेहमीच असेल…!