पुन्हा सातपुतेच का?
भारत देश १९४७ साली स्वतंत्र झाला, पण महाराष्ट्रातील एससी समाज कायदेशीरदृष्ट्या स्वतंत्र झाला असला तरी मानसिकदृष्ट्या तो गुलामच आहे. ‘जाता जात नाही ती जात’ असे म्हणतात ते खरंच आहे. पुरोगामी महाराष्ट्रातही प्रस्थापितांकडून प्रत्येक जातीची पायरी ठरवली जाते. संविधानातील तरतुदीनुसार महाराष्ट्रातील २९ विधानसभा मतदारसंघ राखीव झाले. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून २०१९ साली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊसतोड मजुराचा मुलगा रामभाऊ सातपुते यांना आमदार केले. तेव्हा आपल्याला मिळालेल्या संविधानिक अधिकाराचा वापर करून आमदार रामभाऊ सातपुते यांनी गेली कित्येक वर्षे विकासांपासून वंचित राहिलेल्या गावांचा कायापालट केला. यादरम्यान प्रस्थापित मोहिते पाटलांच्या सूडाच्या राजकारणाला लगाम बसला. विरोधकांच्या गावांना विकासापासून वंचित ठेवून खुनशी राजकारण करणाऱ्यांचे दिवस संपले. विरोधकांना विकासापासून वंचित ठेवण्याबरोबरच स्वाभिमानी एससी समाजाला मोहिते पाटलांनी कधी राजकीय वाटा मिळू दिला नव्हता. माळशिरस तालुक्यातील एससी समाजाला डावलून स्व. हनुमंतराव डोळस यांच्यासारखे कठपुतलीसारखे आमदार मोहिते पाटलांना हवे होते. म्हणजे माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा एससीसाठी राखीव असला तरी येथून आपलाच दूत मोहिते पाटलांना विधानभवनात पाठवायचा होता. मात्र २०१९ साली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपाशीर्वादाने आमदार झालेल्या रामभाऊ सातपुते यांनी यास छेद देऊन लोकप्रतिनिधी म्हणून एससी समाजाला मिळालेल्या अधिकाराचा स्वतंत्रपणे वापर करून राजकारणातील गुलामगिरी मोडून काढली. मग अशा स्वतंत्र विचारसरणीच्या कर्तृत्ववान, स्वाभिमानी, लढवय्या आमदाराची आपल्याला का ॲलर्जी असावी?
वास्तविक पाहता आमदार रामभाऊ सातपुते यांनी पाच वर्षे आमदार म्हणून काम करताना एक जनतेचा सेवक म्हणूनच काम केले आहे. मी आमदार आहे म्हणजे इतरांपेक्षा वेगळा आहे असे त्यांनी कधीच समजले नाही. कधी जनता दरबार भरवून, कधी माळशिरस गेस्ट हाऊसमध्ये बसून, तर कधी लोकांमध्ये जाऊन आमदार रामभाऊ सातपुते यांनी जनतेची कामे केली आहेत. आरोग्यसेवक म्हणून त्यांनी अनेकांचे जीव वाचवले आहेत. आरोग्यसेवक यावरुन मोहिते पाटील व त्यांचे समर्थक त्यांना टार्गेट करुन आम्हीही अनेकांची हॉस्पिटलची कामे केली, पण कधी गवगवा केला नाही असे म्हणतात. मात्र रामभाऊ सातपुते आमदार होण्यापूर्वी लोकांना ते दिसले कसे नाही? तसेच ७० वर्षांत जो विकास मोहिते पाटलांनी केला नाही तो विकास मी ५ वर्षांत केला असे छातीठोकपणे आमदार रामभाऊ सातपुते बोलल्यावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांनी केलेल्या विकासकामांची जंत्रीच वाचून दाखवली. पण त्यांनी सांगितलेली शिक्षण प्रसारक मंडळ, शिवरत्न शिक्षण संस्था, शिवामृत दूध संघ, महर्षी कारखाना, शंकर कारखाना ही विकासकामे जनतेसाठी नव्हेत, तर मोहिते पाटलांनी स्वतःचाच विकास केलेला आहे. याठिकाणी राबत असलेला कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या पगारावर राबत आहे. दरम्यान मोहिते पाटलांनी स्वतःचाच विकास करुन कर्मचाऱ्यांना रोजगार मिळवून दिले असले तरी त्यांना मिळत असलेली वागणूक गुलामासारखीच आहे. आमदार रामभाऊ सातपुते यांनी आपल्या कामातून जनसंपर्क वाढवला. लोकप्रतिनिधी म्हणून सूडबुद्धीचे राजकारण न करता खुल्या मनाने कुठल्याही अपेक्षेशिवाय जनतेची कामे केली. ज्यांनी विरोधात मतदान केले त्यांचीही कामे केली. कामे करताना मोहिते पाटलांसारखी हा कुठला, तो कुठला अशी चौकशी न करता त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. मोहिते पाटलांना रबर स्टॅम्पसारखा, कटपुतलीसारखा आमदार हवा होता. परंतु आमदार रामभाऊ सातपुते यांनी त्यास छेद दिला. आम्ही आमदार केले, आम्ही आमदार केले असा डंका पिटणाऱ्या मोहिते पाटलांना भाजपाने भरभरुन दिले म्हणूनच त्यांनी आमदार केले. तुम्ही जेव्हा मुंबईत रहात असलेल्या स्व. हनुमंतराव डोळस यांना दोन टर्म आमदार केले तेव्हा ते पार्सल नव्हते का? माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते तेव्हा ते पार्सल नव्हते का? पण आपल्या कामातून आमदार रामभाऊ सातपुते यांनी मोहिते पाटलांसह उत्तम जानकरांचेही अस्तित्वाला घरघर लागल्यामुळेच हे सत्तेसाठी हपापलेले संधीसाधू एकत्र आले. आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे कुणीही गेले तरी त्यांचे काम होत होते. मोहिते पाटलांसारखी तोंडं बघून त्यांनी कामे केली नाहीत. पुन्हा एकदा मोहिते पाटलांच्या मर्जीतील आमदार झाला तर खाबुगिरी वाढणार, सूडाचे राजकारण वाढणार, जनतेला पुन्हा शिवरत्नचे उंबरे झिजवावे लागणार, स्वाभिमानी जनतेची व विरोधकांची माती होणार. कुणालाही तात्काळ मदत मिळणार नाही, कामे होणार नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा मान झुकवत लोकांना शिवरत्नकडे जावे लागेल. दहशत वाढणार, सत्ताधारी शिवरत्न मदमस्त होणार, जे स्वाभिमानी आहेत त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करणार हे मात्र निश्चित! आमदार रामभाऊ सातपुते यांनी कधीही सूडाचे, दहशतीचे राजकारण केले नाही. जनतेचा सेवक म्हणूनच त्यांनी आपल्या आमदारकीचा कार्यकाळ घालवला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात की, विकास कुणाचा झालाय ते जनतेला दिसतंय. मग फक्त मोहिते पाटलांचाच विकास व्हावा का? रामभाऊ सातपुते यांच्यासारख्या लढवय्या लोकप्रतिनिधीने झोपडीतच रहावे का? तुम्ही बांधा बंगले वाडे, आणि दलितांनी काय झोपडीतच रहावे काय? हीच का तुमची मानसिकता! आमदार झाल्यावर प्रगती तर होणारच ना! इतरांसारख्या बॅंका, संस्था, पतसंस्था तर खाल्ल्या नाहीत. आमदार रामभाऊ सातपुते यांनी जनतेची विविध प्रकारची विकासकामे करुन स्वकर्तृत्वाने प्रगती केली आहे. आमदार रामभाऊ सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने ते जनतेचे कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकतात, विकासकामांचा डोंगर उभा करु शकतात. आमदार रामभाऊ सातपुते यांनी शिवरत्नवर आपली सहीची कोरी लेटरपॅड न देता स्वतंत्र बाण्याने कामे केली आहेत. आणखी पाच वर्षे ते आमदार म्हणून राहिले तर माळशिरस तालुका पूर्णपणे दहशतमुक्त होऊन तालुक्याचा कायापालटच होणार आहे. आणि उत्तम जानकर आमदार झाले तर मोहिते पाटलांची ताकद वाढून माळशिरस तालुक्याला पुन्हा एकदा सूडाच्या राजकारणाला, दहशतीला, कुरघोड्यांना सामोरे जावे लागणार आहे. म्हणूनच आपल्याला पुन्हा एकदा माळशिरस विधानसभा मतदारसंघातून रामभाऊ सातपुते यांनाच आमदार करावे लागेल हे लक्षात ठेवा!