विधानसभेच्या लगीनघाईत इच्छुकांची मांदियाळी!
येत्या दोन महिन्यांत विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून इच्छुकांनी जनसंपर्कावर भर दिला आहे. तर एससी समाजाने जातचोर उत्तम जानकरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन बौध्द किंवा मातंग समाजातील कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याने उमेदवारीसाठी अनेकांमध्ये चढाओढ लागलेली पहायला मिळत आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा एससी समाजासाठी राखीव झालेला त्यांचा हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे एकवेळ बाहेरचा ओरिजनल एससी समाजाचा उमेदवार परवडला पण जातचोर नको, कारण ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय’ अशी एससी समाजातील बुद्धिजीवी वर्गाची भावना आहे. मात्र जातचोर उत्तम जानकरांच्या धनगर-खाटिक या बोगस जातीच्या दाखल्याला खतपाणी घालणारे एससी समाजातीलच काही संधीसाधू कार्यकर्ते होते ही खूप मोठी शोकांतिका आहे. २००९ साली जातचोर जानकर या कार्यकर्त्यांना मसिहा वाटत होते. तर २०१९ साली सुध्दा आमदार रामभाऊ सातपुते यांच्या विरोधात भूमिका घेऊन या कार्यकर्त्यांनी जातचोर उत्तम जानकर यांचेच काम करुन एससी समाजातील कार्यकर्त्यांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला. परंतु या संधीसाधू कार्यकर्त्यांना उत्तम जानकरांच्या घुसखोरीचे आताच इतके वावडे का वाटू लागले आहे? तर आमदारकी ही फक्त आपल्यालाच मिळावी यासाठीच हा सारा अट्टाहास सुरू आहे. वास्तविक पाहता माळशिरस तालुक्यातून बौध्द व मातंग समाजातील अभ्यासू, उमद्या, निष्कलंक नेतृत्वालाच आमदारकीची संधी मिळायला पाहिजे. यासाठी बैठकीचे योग्य नियोजन करुन योग्य उमेदवार कोण हे ठरवून त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला पाहिजे. पण जातीचे भांडवल करून आमदारकीसाठी आपणच किती योग्य आहे? हे एससी समाजाला पटवून देणारे संधीसाधू आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी समाजाला कुणाच्याही दावणीला नेऊन बांधणार काय? एससी समाजातील बौध्द किंवा मातंग समाजाचा आमदार व्हावा ही बहुतांशी एससी समाजाची प्रामाणिक तळमळ आहे. काही बुध्दिजीवी कार्यकर्त्यांनी जातचोर उत्तम जानकरांचे काम केले असेल तर त्यांनी कामापुरते काम ठेवले, मात्र जातचोरीचे कधीही समर्थन केले नाही. त्यांनी आपल्या समाज बांधवांशी प्रामाणिक भूमिका घेतली. बौध्द व मातंग समाजातील कार्यकर्त्याला प्रस्थापित राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळायलाच हवी. पण ज्यांचा इतिहासच संधीसाधूपणाचा असेल त्यांच्या पाठीशी समाज कसा उभा राहील? बौध्द व मातंगांमध्ये अनेक क्लीन चेहरे आहेत. एससी समाजाच्या बैठकीला पारावरच्या गप्पांसारखे स्वरुप न देता निःस्वार्थीपणाने बौध्द व मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन योग्य तोच उमेदवार ठरवला पाहिजे. पण मागील बैठकीची पार्श्वभूमी पाहता हे काम खूप कठीण वाटत आहे. यात बुद्धिजीवी वर्गाने ठरविले तर योग्य तो मार्ग निघेलच! पण त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. माळशिरस तालुक्यातील बौध्द व मातंग समाजातील इच्छुकांपैकी सध्या जयंत खंडागळे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आघाडीवर आहे. तर त्या पाठोपाठ बाळासाहेब धाईंजे, लालासाहेब अडगळे यांची नावं चर्चेत आहेत. तसेच भाजपाकडून जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य कालकथित भीमराव सावंत यांचे सूपुत्र आकाश सावंत, अतुल सरतापे हे स्थानिक कार्यकर्ते इच्छुक आहेत. यापैकी आकाश सावंत यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. वडील जिल्हा परिषद सदस्य होते, तर आई माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा होत्या. मात्र अतुल सरतापे यांना तशी पार्श्वभूमी नाही. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनच अतुल सरतापे यांची ओळख आहे. मात्र आमदार रामभाऊ सातपुते हे बाहेरचे उमेदवार असले तरी त्यांच्याइतके काम आजपर्यंतच्या कुठल्याच आमदाराने न केल्याने भाजपाकडून त्यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्यानंतर किशोर सूळ, भूषण कांबळे यांचीही नावं चर्चेत आहेत. त्यापैकी किशोर सूळ यांचे धनगर समाजातील प्राबल्य, तर भूषण कांबळे उस्मानाबादचे माजी खासदार शिवाजी कांबळे यांचे चिरंजीव व उद्योजक इतकीच त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर महायुतीमध्ये असलेल्या पीआरपीचे महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष सोमनाथ भोसले हे सुद्धा इच्छुक आहेत. दरम्यान भाजपाकडून आमदार रामभाऊ सातपुते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जयंत खंडागळे यांचे पारडे जड वाटत असले तरी शेवटच्या क्षणी काहीही घडू शकते. विधानसभेच्या लगीनघाईत इच्छुकांची मांदियाळी दिसून येत असली तरी दोन्ही पक्षांपैकी एकाने जरी स्थानिक भूमीपुत्र असलेल्या बौध्द किंवा मातंग समाजातील कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी दिली तर एससी समाज त्याच्याच पाठीशी उभा राहणार हे मात्र नक्की!