Back To Top

लोकशाही मार्गाने अकलूज मार्केट कमिटीत उत्तमराव जानकर बोलणारच – पांडुरंग (तात्या) वाघमोडे

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): अकलूज कृषी उत्पादन बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक लोकनेते जनतेचे आमदार श्री उत्तमराव जानकर यांना माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून दिले. त्यामुळे एक संचालक म्हणून त्यांना अकलूज मार्केट कमिटीबाबत बोलायचा अधिकार लोकशाही मार्गाने आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तो अधिकार उत्तमराव जानकर यांना दिलेला आहे. त्यामुळे इतर संचालकांनी आमच्या नेत्यावर टीका करू नये. तुम्हाला जे विचारायचे आहे ते विचारायचं, नसेल विचारायचं तर गप्प बसायचं असे वक्तव्य माळशिरस तालुका भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष पांडुरंग (तात्या ) वाघमोडे यांनी केले आहे.

अकलूज मार्केट कमिटीच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्यानंतर उत्तमराव जानकर यांच्याबद्दल बोलणाऱ्यांचा समाचार घेताना पांडुरंग (तात्या) वाघमोडे बोलत होते. यावेळी विरोधकांना गर्भित इशारा देताना ते पुढे म्हणाले की, मोहिते पाटलांचे विजय शुगर व शंकररत्न शुगर हे दोन खाजगी कारखाने ताब्यात घेऊन बँकेने लिलाव काढला. माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या अनेक सहकारी संस्था त्यांचे रक्ताचे वारस असताना यांनी बंद पाडल्या, त्याबद्दल कुठलाही संचालक बोलत नाही. आता फक्त हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या संस्था चालू आहेत. आणि जर या संस्था चालू ठेवायच्या असतील, लिलाव निघू द्यायचा नसेल तर वर्षातून एकच दिवस त्या सभासदांना आणि शेतकऱ्यांना चेअरमन व संचालक मंडळांना जाब विचारायचा अधिकार आहे. हा सहकार कायदा व पणन कायदा महाराष्ट्र शासनाने तयार केलेला आहे. उरलेल्या पाच संस्थांचे वारसदार मालक होऊ शकत नाहीत. ह्या सर्व संस्थेचे मालक माळशिरस तालुक्यातले शेतकरी सभासद व ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यामुळे आपली बापजाद्याची इस्टेट असल्यासारखं वागू नये. जी संस्था शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे ती शेतकऱ्यांची रहावी आणि त्याचा कारभार पारदर्शीपणाने चालावा म्हणून ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून दिलेले संचालक उत्तमराव जानकर हे बोलणारच आहेत. आणि पुढील साडेचार वर्षे अकलूज मार्केट कमिटीमधील भ्रष्टाचार थांबवणारच आहेत. त्यामुळे इतर संचालकांना बोलायचं नसेल तर ऐकून घ्यायचं धाडस ठेवा. सभापती यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीत सभापती आणि संचालकांनी हॉलमधून पळून जायचं नसतं, उत्तर द्यायचं असतं. प्रश्न ऐकून घ्यायचे असतात. तरच संस्थेची प्रगती होत असते. तुम्हाला भजी खायला आणि चहा प्यायला निवडून दिलेलं नाही. तुम्ही आपल्या उंचीपुरतेच बोला आणि राहिलेल्या साडेचार वर्षात तुम्ही स्वतः मार्केट कमिटीसाठी काय केलं आणि काय करणार आहे तेवढे सांगा. दुसऱ्याची मापं काढायची गरज नाही असे यावेळी बोलताना पांडुरंग तात्या वाघमोडे म्हणाले.

Prev Post

उत्तर अमेरिकेत उभारला डॉ. आंबेडकरांचा सर्वांत उंच पुतळा

Next Post

पथ विक्रेत्यांना अमानुष व बेकायदेशीर मारहाण व तक्रारदारांवर अन्याय करणाऱ्या…

post-bars

Leave a Comment