मोहिते पाटलांनी विरोधकांना बोलू न देता अकलूज बाजार समितीची वार्षिक सभा गुंडाळली
चौथा स्तंभ फाट्यावर- गल्ली ते दिल्लीपर्यंत कुठलेही कार्यक्रम असले तरी आजपर्यंत पत्रकारांना कुठेही मज्जाव केल्याचे ऐकण्यात आले नाही. मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला या सभेच्या हॉलमध्ये प्रवेश नाकारून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांनी चौथ्या स्तंभालाच फाट्यावर मारल्याचे दिसून आले. याबाबत सचिव राजेंद्र काकडे यांना विचारले असता सभापतींनी कुठल्याच पत्रकाराला आत सोडू नका असे आदेश दिल्याचे सांगितल्याने सभापतींना पत्रकारांची इतकी एलर्जी का? असा प्रश्न उपस्थित करून पत्रकारांनी याबाबत दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली.
गेल्या चाळीस वर्षांपासून या बाजार समितीची वार्षिक सभा घेतलेली नव्हती. १५ ऑगस्टला झेंडा खरेदी केल्याचे बिल ६३ हजारांचे लावलेले आहे. गाळ्यांची मुदत संपून ९० टक्के गाळे रिकामे आहेत. त्यामुळे फेरलिलाव काढणे गरजेचे आहे. बाजार समितीवर ऑडिटरनेही वेळोवेळी ताशेरे मारलेले आहेत. बाजार समितीने बांधलेल्या १२ गाळ्यांचा खर्च ६६ लाख ७० रूपये काढला आहे. आम्हीही वेळापूर गाळे बांधले होते, त्याला २४ लाख गेले होते. म्हणजेच अकलूज बाजार समितीने या गाळ्यांच्या मागे ४२ लाख ७० रूपये काढले आहेत. तसेच बाजार समितीकडून एकाच ठेकेदाराला काम दिले जाते. १२ गाळ्याच्या लिलावात १ कोटी २० लाखांचा अपहार केला आहे. तसेच ५ कोटी उत्पन्नातून ४ कोटी बेकायदेशीर काढले जातात.
– उत्तमराव जानकर
लोकशाहीमध्ये सरपंच सदस्य या मोठ्या घटकाचा आज अपमान झाला. सत्ताधाऱ्यांना चर्चाच करायची नव्हती. आजचा हा लोकशाहीचा काळा दिवस आहे. ४३० गाळ्यांपैकी २८० गाळ्यांची मुदत संपलीय. त्याचा फेरलिलाव करावा हा मुद्दा उत्तमराव जानकर मांडणार होते. यामुळे डिपॉझिट ५ कोटी वाढले असते, तर ५० लाख भाडे मिळाले असते. आम्ही बाजार समितीसाठी हे उत्पन्नाचे साधन म्हणून सुचविणार होतो. पण आम्हाला बोलूच दिले नाही. फलटण, बारामती, इंदापूर या बाजार समितीच्या मागे असलेल्या अकलूज बाजार समितीला पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे. पण सभापती व संचालकांनी माळशिरस तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा गळा घोटला.
– भानुदास सालगुडे पाटील
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोहिते पाटील विरोधक उत्तमराव जानकर हे एकमेव संचालक म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी बाजार समितीतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्यास सुरूवात केली. त्यामुळे त्यांचे संचालकपद हे मोहिते पाटलांची डोकेदुखी ठरताना दिसत आहे. जानकर यांच्या निवडीनंतर पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत उत्तमराव जानकर यांनी सर्व संस्थेतील सभासदांना एकत्रित केले. मात्र यादरम्यान मोहिते पाटील यांच्या सभासदांनी विरोधकांना बोलू न देता बाजार समितीची सभा गुंडाळल्याने सभासदांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उत्तमराव जानकर यांनी बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेला सर्व विरोधकांना येण्याचे आवाहन केल्यानंतर विरोधकांना थोपविण्यासाठी मोहिते पाटलांनीही जय्यत तयारी केली होती. यादरम्यान सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा लवाजमा तैनात करण्यात आला होता. संस्थेचा ठराव असल्याशिवाय कुणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. पण काही विरोधकांनी संस्थेचा ठराव असतानाही तो ठराव दाबून ठेवून विरोधकांची यादीतून नावे वगळल्याचे आरोप केले आहेत. सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या सभेच्या दरम्यान विषय वाचनाला सुरूवात करताच मोहिते पाटील यांचे सभासद मंजूर मंजूर म्हणून मोठमोठ्याने ओरडत होते. उत्तमराव जानकर यांनी बोलायला सुरूवात केल्यावर आम्हाला तुमचे काही ऐकायचे नाही म्हणून त्यांचा माईकच बंद करण्यात आला. त्यानंतर फॅन व लाईटही बंद करण्यात आली. त्याचबरोबर सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी अध्यक्षीय भाषणाला सुरूवात करताच आम्हालाही तुमचे भाषण ऐकायचे नाही म्हणून उत्तमराव जानकर समर्थक सभासदांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यानंतर मदनसिंह मोहिते पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक सभास्थळावरून बाहेर पडले. तेव्हा विरोधकांनी उत्तमराव जानकर यांचा विजय असो अशा घोषणा द्यायला सुरूवात करताच मोहिते पाटील समर्थकांनीही मोहिते पाटील यांचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर उत्तमराव जानकर सभास्थानावरून बाहेर पडताच मोहिते पाटील समर्थक काही कार्यकर्त्यांनी ओरडायला सुरूवात करून जानकर यांना खालच्या थराची भाषा वापरली. एकूणच अकलूज कृषी बाजार समितीच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पण या सभेनंतर सत्ताधारी मोहिते पाटील समर्थक व उत्तमराव जानकर समर्थक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून आले.