काही कोटींचे कर्ज उपलब्ध होत असतानाही जनतेचे पैसे देण्यास सलमान चौधरीची उदासीनता
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): बुल्स कॅपिटल या कंपनीत पैसे गुंतविल्यास काही महिन्यात डबल व लाईफटाईम इन्कम या स्कीमचे आमिष दाखवून इम्रान चौधरी आणि सलमान चौधरी या दोघा भावांनी अकलूजमधील अनेक नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. याबद्दल त्यांचेवर गुन्हाही दाखल असून ते सध्या फरार आहेत. परंतु जनतेचे रिटर्न पैसे देण्यासाठी सलमान चौधरी यांना काही कोटींचे कर्ज उपलब्ध होत असतानाही सदरचे कर्ज न घेऊन जनतेचे कोट्यवधी रुपये देण्यास सलमान चौधरी यांची उदासीनता असल्याचे दिसून येत आहे.
फळे विक्रेते असलेल्या या दोघा भावांनी आपल्या वडिलांना पुढे करून लोकांचा विश्वास संपादन केला. आशा ही खूप वाईट असते. एखाद्याने आमिष दाखवले की माणूस त्याच आशेवर जगतो. इम्रान व सलमान हे दोघेजण चांगल्या स्वभावाची आणि प्रामाणिक मुले आहेत असे गुंतवणूकदारांना सुरुवातीला वाटले. कारण त्यांचे बोलणेच इतके मधाळ होते. त्यामुळे लोकांनी सुरुवातीला थोडे थोडे पैसे गुंतवून पाहिले. तेव्हा यांनी लोकांना चांगला परतावा मिळवून दिला. परिणामी लोकांची आशा वाढत गेली आणि त्यांनी मोठी रक्कम गुंतवायला सुरुवात केली. काही लोकांनी आपल्या जमिनी विकून बुल्स कॅपिटल या कंपनीत लाखो रुपये गुंतवले, तर काहींनी व्याजाने काढले. त्याचबरोबर काही लोकांनी स्वतः हमी घेऊन इतर अनेक लोकांना बुल्स कॅपिटल या कंपनीत पैसे गुंतवायला लावले. त्यामुळे लोकांनी यांच्यावर विश्वास ठेवून लाखो रुपये गुंतवले. परंतु कालांतराने कोट्यवधी रुपये गोळा करून इम्रान व सलमान या दोघा भावांनी त्यांना परतावा देण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली. हे दोघे भाऊ अकलूजमधून गायब होऊन पुण्यात राहू लागले. तेव्हा त्यांचे घर शोधत अकलूजमधील काही लोक त्यांच्या घरापर्यंत पोहोचले. मात्र त्यानंतर अकलूजमधील काही गुंतवणूकदारांनी इम्रान व सलमान या दोघा भावांवर गुन्हा दाखल केल्यानंतर हे दोघेजण काही महिन्यांपासून फरार आहेत. हे दोघे पैसे घेऊन पळाले, त्यामुळे गुंतवणूकदार उध्वस्त झालेत. पैसे मिळवून देण्यासाठी पुढे झालेल्या काही लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. ज्यांनी जमिनी विकल्या त्यांच्या हातात आता काहीच राहिले नाही. लोकांकडून व्याजाने घेतलेले पैसे गुंतवणूकदार देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. आज ना उद्या आपले पैसे मिळतील या आशेवर जगत असलेल्या लोकांचे पैसे मिळण्याची वेळ आली, पण सलमान चौधरी यालाच लोकांचे पैसे द्यायचे नसल्याने त्याला मिळत असलेले काही कोटींचे कर्ज घेण्यास तो असमर्थता दाखवत असल्याचे खात्रीशीर वृत्त समजते. या दोघा भावांचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा पाहून बुल्सने अकलूजमधील काही गुंतवणूकदारांना भुईसपाट केल्याची चर्चा होताना दिसत आहे. मात्र यामागील कर्ता धनी कोण? माळशिरस न्यायालयात अटकपूर्व जामीन कसा मांडला जातो? असा प्रश्न अकलूजकरांतून उपस्थित होत आहे.