केंद्र सरकारच्या पत्रिकेत नाव, पण जिल्हाध्यक्षांना मोहिते पाटलांची एलर्जी
आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांबद्दल जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांचा खोडीलपणा
अरे कुठे नेऊन ठेवलीय भाजपा…?
सोलापूर (बंडखोर वृत्तसेवा): केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथे सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची पत्रिका दिल्लीतील भाजपाश्रेष्ठींनी काढून त्या पत्रिकेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव टाकले होते. मात्र मोहिते पाटील विरोधक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ताटाखालचे मांजर असलेल्या जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी जिल्ह्याच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रिकेत जाणीवपूर्वक व खोडसाळपणे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाला कात्री लावल्याने सूडाचे राजकारण पाहून अरे कुठे नेऊन ठेवलीय भाजपा? असा सूर सोलापूर जिल्ह्यातील जनतेत उमटत आहे.
चेतनसिंह केदार यांचा सोलापूर जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष होण्यासाठी राम सातपुते यांचे खंदे समर्थक आप्पासाहेब देशमुख यांच्याशी पंगा घ्यावा लागला. चेतनसिंह केदार यांना पुन्हा एकदा सोलापूर जिल्हाध्यक्ष करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वरिष्ठ नेत्यांना हाताशी धरून आपली सर्व ताकद पणाला लावली होती. त्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांनी विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमाच्या माध्यमातून मोहिते पाटलांना डिवचण्याचे काम केले असले तरी त्यांना घंटा फरक पडणार नाही. कारण मोहिते पाटील विरोधक म्हणून काम करीत असलेले त्रिकूट त्यांच्या विरोधात कुरघोड्या करून दमले, पण मोहिते पाटलांना काहीही फरक पडला नाही. पत्रिकेतून नाव गाळून जिल्हाध्यक्ष व त्रिकूटाला कसला असूरी आनंद झाला असेल? अरे, पण तुम्ही मोहिते पाटलांच्या विरोधात कितीही कटकारस्थाने केली तरी तुमचा गॉडफादर मोहिते पाटलांना डावलू शकत नाही. महाराष्ट्रातील मातब्बर नेते भाजपाच्या वळचणीला गेले होते, तरीही धैर्यशील मोहिते पाटील यांनी कसल्याही दबावाला भीक न घालता विरोधात लढून माढ्याची खासदारकी पटकावली, तर विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांनाही धूळ चारली. भाजपाच्या विरोधात लढून मोहिते पाटलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर व राम सातपुते यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केल्याने हा घाव त्यांच्या चांगलाच वर्मी बसला असून यामुळे ते हतबल झाले आहेत. म्हणूनच सातत्याने त्यांना स्वप्नातही मोहिते पाटीलच दिसत आहेत. आम्हाला तर वाटतंय की, झोपेत सुध्दा ते मोहिते पाटलांचाच विचार करीत असतील. इतके हे संधीसाधू विरोधक बेचैन झाले आहेत. ‘मोठमोठ्या बाता आणि ढुंगण खाये लाथा’ अशी एक म्हण आहे ती नेमकी मोहिते पाटलांच्या विरोधात सातत्याने भाषणे ठोकून लोकांनाही न पटणारी वक्तव्ये करणाऱ्या राम सातपुते यांना लागू पडते. कारण आता या घडीला विधानसभा निवडणूक लागली तर त्यांना ७० हजारही मतं पडणार नाहीत अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. राम सातपुते यांच्या अहंकारी प्रवृत्तीला व सूडाच्या राजकारणाला वैतागून त्यांना बरेचजण सोडून गेले आहेत. मोहिते पाटलांना तत्वाने विरोध करावा, उगीच ऊठसूठ मोहिते पाटील एके मोहिते पाटील असे रोजचे तुणतुणे काय कामाचे? म्हणून अनेकांनी राम सातपुते यांना अखेरचा ‘रामराम’ ठोकला आहे. पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे म्हणतात ते खरंच आहे. सोलापूर जिल्ह्यातील कार्यक्रम पत्रिकेत सुध्दा मोहिते पाटील दिसू नयेत यासाठी त्रिकूटाने जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या माध्यमातून आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांचे नावाला कात्री लावली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वळचणीला असणाऱ्या चेतनसिंह केदार यांच्याकडून आणखी काय अपेक्षा? परंतु या त्रिकूटाने शिस्तप्रिय भाजपाची वाट लावल्याने कुठे नेऊन ठेवलाय भाजपा? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.