गोरगरिबांच्या स्वप्नांना डसणारा काळा नाग!
विषारी नाग जेव्हा एखाद्या मनुष्याला डसतो, तेव्हा मनुष्य तडफडतो, कासावीस होतो, कधीकधी प्राण सोडतो. पण माणसातही काही काळे नाग असतात. जे गोरगरिबांच्या स्वप्नांना डसतात, त्यांनी आयुष्यभर जमा केलेली पुंजी बचत हिरावून घेतात. तेव्हा ती माणसं मरत नाहीत, मात्र अखेरपर्यंत तडफडत शोषण करणाऱ्या शोषिताला शाप देत जीवन जगतात. आजही माणसातील काही काळे नाग सरंजामशाही वृत्तीने आपला उदोउदो करुन घेतात.
सरंजामशाही वृत्तीचे लोक राजमहालात रहात असतात. परंतु खरी सामाजिक क्रांती झोपडीत जन्मलेल्या माणसांतून होत असते. राजमहालात तर दुसऱ्यांचे रक्त पिणारे ढेकूणच जन्माला येतात. सर्वसामान्य तळागाळातील माणसं आपल्या घरात कुणाचा वाढदिवस असो, किंवा आणखी कुठला उपक्रम असो इव्हेंट करण्याचे टाळतात. मात्र याच माणसांना सरंजामशाही वृत्तीची माणसं आपला उदोउदो करण्यासाठी स्वतःचे फ्लेक्स बोर्ड लावायला भाग पाडतात.
उन लोगों को आझाद करना मुश्किल हैं,
जो अपनी जंजीरो की इज्जत करते हैं।
स्तुतिपाठक आणि चमच्यांच्या गराड्यात वावरणाऱ्या नेत्यांना आत्मभान आणि जाणीव नसते. स्वतःचा मान, प्रतिष्ठा, अहंकार यांनाच जाणणारी आणि जपणारी माणसं “जाणती” असतात का?
जूते घिसकर बनाई हुई पहचान, और जूते चाटकर बनाई गई पहचान में बडा फर्क होता हैं।
जी माणसं फक्त पैशालाच किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं टिकत नाहीत. म्हणून तर काहीजणांच्या लोकप्रियतेचा आलेख खाली येताना विधानसभेतील मतदान टक्केवारीवरुन दिसून येत आहे. स्वतःचा उदोउदो करण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करून श्रीमंतीचे दर्शन घडविण्याऐवजी गोरगरिबांच्या मुलामुलींचे सामुदायिक विवाह, शिक्षण त्याच पैशातून केले असते तर माणुसकीचे दर्शन घडले असते.