माळशिरस वकील संघटनेमार्फत संविधानदिन उत्साहात साजरा
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माळशिरस वकील संघटनेच्या वतीने माळशिरस न्यायालयातील वकील संघाच्या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संविधानदिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमावेळी वकील संघटनेच्या अध्यक्षा ॲड. मोहिनी देव, उपाध्यक्ष ॲड. राहुल लवटे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. माधव मिरासदार, ॲड. एस. बी. पाटील, ॲड. डी. एन. काळे, ॲड. आर. एस. वाघमोडे, ॲड. जी. पी. कदम आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले व सामुदायिक संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना ॲड. सुयश सावंत व ॲड. वैभव धाईंजे यांनी संविधानाचे मूल्य, जोपासना व संविधानाच्या साक्षरतेच्या गरजेवरती भाष्य करून वक्तृत्व सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. भारत गोरवे यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड. सुमित सावंत यांनी केले. सदर कार्यक्रमास माळशिरस वकील संघटनेचे वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. धनंजय बाबर, ॲड. भारत गोरवे, ॲड. सुमित सावंत, ॲड. अभिषेक चंदनशिवे, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. मनोज धाईंजे यांनी परिश्रम घेतले.