माढा लोकसभा मतदारसंघात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि तुतारी चिन्हावर डॉ. अनिकेत देशमुख यांच्यातच लढत होण्याची शक्यता!
माढा (बंडखोर वृत्तसेवा): काल बंडखोरने खा. शरद पवारांच्या लिस्टमध्ये पहिल्या पसंतीत डॉ. अनिकेत देशमुख यांचे नाव असल्याचे जाहिर केल्यावर त्यांनी तात्काळ पवारसाहेबांची भेट घेऊन आपण माढा मतदार संघातील इच्छुक उमेदवार असल्याचे सांगितले. माढा मतदारसंघात धनगर समाजाची बहुसंख्य मतदार संख्या आणि पवारसाहेबांचे जिवलग व एकनिष्ठ मित्र स्वर्गिय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुखच तुतारीवर निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता बारामतीच्या राजकीय गोटातून वर्तविण्यात येत असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि तुतारी चिन्हावर डॉ. अनिकेत देशमुख यांच्यातच लढत होईल असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
खा. शरद पवार यांना यापूर्वी रासपाचे महादेव जानकर हे माढ्यातून हवे होते. मात्र महायुतीने परभणीतून जानकरांना उमेदवारी देऊन एक मित्र पक्ष जोडला. त्यामुळे आता पवारसाहेबांच्या नजरेसमोर शेकापआहे. शेकापला उमेदवारी दिल्यास कोकणातही आपणाला भविष्यकाळात मदत घेता येईल असा विचार शरद पवार करीत आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून समजते की शेकापचे जयंत पाटील यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासाठी पवारसाहेबांकडे पूर्ण ताकद लावली आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबले गेल्यामुळे बंड करण्यासाठी जे धाडस आणि साहस लागते ते त्यांच्यात दिसून येत नाही. स्वयंघोषित जाणते राजे जरी म्हणत असले की आम्ही रणजितला वाळीत टाकले आहे तरी जनता इतकीही दूधखुळी राहिली नाही. आता मतदारांची राजकीय साक्षरता वाढलेली आहे. रणजितसिंह यांच्याकडे भाजपाची आमदारकी ठेवून धैर्यशील यांना तुतारीवर खासदारकी प्राप्त करायची दोन डगरीवर हात ठेवण्याची शिवरत्नची वृत्ती महाराष्ट्रातील सर्वच जनतेने ओळखली आहे. पवारसाहेब तर मुरलेले राजकारणी आहेत. पवारसाहेबांच्या बैठकीत असा विचार झाला की शिवरत्नच्या पाठीमागे आज त्यांच्या माळशिरस तालुक्यातील सुध्दा आमदार नाही. दुसऱ्या बाजूला डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिल्यास शेकापसारख्या मित्रपक्षाची मदत होईल. धनगर समाजाला उमेदवारी दिल्यामुळे बारामती मतदारसंघात खा. सुप्रियाताई सुळे यांना निवडून आणण्यासाठी शेकाप आणि धनगर समाजाची मदत घेता येईल. डॉ. अनिकेत देशमुख यांची स्वच्छ प्रतिमा आणि स्वर्गिय गणपतराव देशमुख यांना मानणारा प्रचंड जनसमुदाय आजही माढा मतदारसंघात आहे. तर धैर्यशील यांना उमेदवारी दिल्यास राजकीय तोटे अधिक दिसून येत आहेत. आततायी व रागीट स्वभावाचे धैर्यशील यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी सोडताना पवारसाहेबांवर घेतलेले तोंडसुख याचीही चर्चा सदर बैठकीत झालेली आहे. त्यामुळेच डॉ. अनिकेत देशमुख यांचे पारडे जड असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.